नागपूरला सुंदर शहर बनवणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:39 PM2019-03-23T23:39:37+5:302019-03-23T23:40:55+5:30
गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली असून पुढील पाच वर्षात नागपूरला जगातील सर्वांग सुंदर शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या पाच वर्षात अनेक कामे झाली असून पुढील पाच वर्षात नागपूरला जगातील सर्वांग सुंदर शहर बनवण्याचा आपला संकल्प आहे, असे केंद्रीय मंत्री व भाजपाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले.
नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच नितीन गडकरी नागपुरात आले. त्यानिमित्त त्यांचे स्वागत विमानतळावर करण्यात आले. गडकरींनी हात उंचावून सर्वांना नमस्कार करीत कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार केला. यानंतर लोकमत प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, नागपूर विकसित व्हावे हाच आपला उद्देश आहे. यासाठी त्यांनी नागपुरात होणार असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. फुटाळा तलाव येथे जगातील सर्वाांत सुंदर असे फाऊंटन उभारण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम येथे भव्य मॉल उभारले जाणार आहे. इतकेच नव्हे तर नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यातील वाहने डिझेलमुक्त व्हावीत, असा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विमानतळावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खा. दत्ता मेघे, खा. कृपाल तुमाने, आ. अनिल सोले, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आ. गिरीश व्यास, आ. ना.गो. गाणार, शहर भाजपाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती माजी अध्यक्ष विकी कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते.