योगेश पांडे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : मध्य भारतातील महत्त्वाचे विद्यापीठ मानण्यात येणाऱ्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा व्याप फार मोठा नाही. मात्र देशाच्या संस्कृती व परंपरेशी जुळलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी शासकीय प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. याच भावनेतून या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठात पारित झाला आहे. संस्कृत विद्यापीठाला नवसंजीवनी देण्यासाठी आता राज्य शासनाच्या पुढाकाराची आवश्यकता असून राज्यातील दुसऱ्या केंद्रीय विद्यापीठाचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.संस्कृत विद्यापीठाचे महत्त्व लक्षात घेता, याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे अशी मागणी गेल्या काही काळापासून जोर पकडते आहे. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, या आशयाचा प्रस्ताव मागील महिन्यात विद्यापीठाच्या विद्वत् परिषदेत संमत झाला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याला अंतिम मान्यता देखील देण्यात आली.मात्र केवळ विद्यापीठात हा प्रस्ताव मंजूर होऊन काहीही फायदा नाही. या प्रस्तावाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो राज्य शासनाला पाठवावा लागणार आहे. राज्य शासनाकडून हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येत असतो. त्यामुळे मंत्रालयात या प्रस्तावाची फाईल किती गंभीरतेने घेतली जाते, यावर केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळणार की नाही हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
संस्कृतच्या प्रचार-प्रसाराला मिळेल बळदेशभरात अपवाद सोडले तर संस्कृत विद्यापीठांची स्थिती फारशी चांगली नाही. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला उच्च शिक्षणाच्या विविध नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अनेकांना वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्यास मदत होऊन त्याचा फायदा शिक्षण क्षेत्राला होईल. संस्कृतच्या प्रचार-प्रसाराला बळ मिळेल.
इतर विद्यापीठांशी तुलना नकोकेंद्रीय विद्यापीठासंदर्भातील मसुदा तयार करण्याची जबाबदारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.कमलसिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय विद्यापीठासंदर्भात धोरण बदलले असले तरी संस्कृत विद्यापीठ हे इतर राज्य विद्यापीठांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे त्यांच्याशी तुलना करणे योग्य होणार नाही. भाषेच्या प्रचार-प्रसाराची आवश्यकता लक्षात घेता केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा विद्यापीठाला विकासाच्या मार्गावर नेईल, असे मत प्रभारी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.