रामटेक पंचायत समिती कॉंग्रेस वाचविणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:25+5:302021-09-24T04:09:25+5:30

राहुल पेटकर रामटेक : रामटेक तालुक्यात जि.प.च्या एका जागेसाठी व पंचायत समितीच्या तीन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक कॉंग्रेसची परीक्षा घेणारी ...

Will Ramtek Panchayat Samiti save Congress? | रामटेक पंचायत समिती कॉंग्रेस वाचविणार का?

रामटेक पंचायत समिती कॉंग्रेस वाचविणार का?

Next

राहुल पेटकर

रामटेक : रामटेक तालुक्यात जि.प.च्या एका जागेसाठी व पंचायत समितीच्या तीन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक कॉंग्रेसची परीक्षा घेणारी आहे. तालुक्यात बाेथियापालाेरा उमरी या जि.प. सर्कलमध्ये तर नगरधन, मनसर व उमरी या पंचायत समिती गणात निवडणूक होत आहे.

सध्या रामटेक पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे; पण सध्या त्यांच्याकडे दाेनच सदस्य आहेत व तीन जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. गत निवडणुकीत काँग्रेसचे निलंबित नेते उदयसिंग यादव यांनी ५ सदस्य निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका वठविली होती; पण सध्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. यादव यांच्यावर अन्याय झाला अशी कार्यकर्त्याची भावना आहे. त्यामुळे यादव यांचे समर्थक या निवडणुकीत काय भूमिका वठवितात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इकडे पं.स. ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. सध्या त्यांच्याकडे चार सदस्य आहेत. त्यांना आणखी दोन सदस्यांची गरज आहे.

बाेथियापालाेरा-उमरी जि.प. सर्कलमध्ये काँग्रेसने माजी जि.प. सदस्य कैलास राऊत यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने उमेदवार बदलवून लक्ष्मण केणे यांना मैदानात उतरविले आहे. शिवसेनेचे देवानंद वंजारी, राष्ट्रवादीचे नकुल बरबटे, गाेंगाेपा व प्रहार आघाडीचे हरिचंद उईके व वंचित बहुजन आघाडीचे नम्रसेन डाेंगरे यांच्यासह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. गत निवडणुकीत राऊत यांना ४९२१ मते मिळाली हाेती; तर शिवसेनेचे देवा वंजारी यांना २६९२ मते मिळाली हाेती. भाजपला १५४२ मते मिळाली हाेती. राऊत हे २२२९ मतानी विजयी झाले हाेते. त्यामुळे दगाफटका झाला नाही तर ही जागा काँग्रेसला आजही सुरक्षित वाटते.

मनसर पंचायत समिती गणासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. येथे माजी सभापती कला ठाकरे पुन्हा उभ्या आहेत. त्या यादव त्यांच्या गटाच्या हाेत्या. शिवसेनेने यावेळी स्वरूपा चाैधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने अर्चना पेटकर यांना उभे केले आहे. मागच्या निवडणुकीत त्या शिवसेनेच्या उमेदवार हाेत्या. कला ठाकरे यांनी त्यांचा ९१५ मतानी पराभव केला हाेता.

नगरधन पंचायत समिती गणासाठी काँग्रेसच्या अश्विता बिरणवार, भाजपच्या कविता बावनकुळे, शिवसेनेच्या मालती बावनकुळे, प्रहारकडून शाेभा सराेदे व काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसचे भूषण हाेलगिरे ७० मतांनी विजयी झाले हाेते. काँग्रेसला २५७१ तर शिवसेनेला २५०१ मते मिळाली हाेती.

उमरी पंचायत समिती गणासाठी काँग्रेसचे महेश मडावी, शिवसेनेचे रमेश बमनाेटे, भाजपचे सुखदेव शेंद्रे, राष्ट्रवादीचे संदीप इनवाते, गाेंगापाचे रामकृष्ण वरखेडे, भूमेश्वरी कुंभलकर, आदी उमेदवार रिंगणात आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसच्या भूमेश्वरी या १०१६ मतांनी विजयी झाल्या होत्या. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर हाेती.

मोर्चेबांधणीला वेग

सध्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गुरुवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक व मंत्री सुनील केदार यांनी रामटेकचा दौरा केला. इकडे भाजप व शिवसेनेच्याही बैठकी सुरू आहेत.

Web Title: Will Ramtek Panchayat Samiti save Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.