कुहीतील मुख्य मार्गाची वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:03+5:302021-03-08T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुही : स्थानिक पंचायत समिती ते नागोबा चौक मांढळ या शहरातील मुख्य मार्गाची चांगलीच दुर्दशा झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुही : स्थानिक पंचायत समिती ते नागोबा चौक मांढळ या शहरातील मुख्य मार्गाची चांगलीच दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर जागाेजागी खड्डे पडले असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही त्रास साेसावा लागताे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे नगर पंचायत प्रशासन लक्ष केव्हा देणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गतवर्षी स्वच्छता सर्वेक्षण अभियानात सहभागी होत नगरपंचायतने देशात क्रमांक पटकाविला होता. त्यात कुही नगर पंचायतला पाच कोटींचे बक्षीस मिळाले होते. परंतु शहरातील पंचायत समिती ते नागोबा चौक मांढळ रोडपर्यंतच्या शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुख्य मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागाेजागी पाणी साचलेले असते. पूर्वी नगर पंचायत कार्यालय ते नागोबा चौकात जाणारा हा मुख्य मार्ग होता. याच मार्गाने एसटी बसेस व जड वाहतूक सुरू हाेती. मात्र बायपास मार्ग झाल्यानंतर कालांतराने जड वाहतूक बंद झाली. सद्यस्थितीत या मार्गावर शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने आहेत. परंतु पार्किंगसाठी कुठेच जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी असतात. त्यातच रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, हा प्रश्न नित्याच झाला आहे.
याच रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा ते गणपती मंदिर दरम्यानचा रस्ता व पुढे नागोबा चौकापर्यंतचा रस्ता बहुतांश ठिकाणी उखडला असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या मार्गावर नाली नसल्याने घरगुती नळांचे तसेच सांडपाणी रस्त्यावर वाहते. परिणामी या मार्गाने वाहतुकीच्या समस्येसह नागरिकांना चिखलाचा सामना करावा लागताे. अनेकदा पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडते. त्यामुळे या रस्त्याचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. नगर पंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून या मुख्य रस्त्याची दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.