शिक्षणातूनच मिळतात ‘विंग्ज आॅफ फ्लाय’
By admin | Published: September 27, 2014 02:36 AM2014-09-27T02:36:01+5:302014-09-27T02:36:01+5:30
आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. स्वप्नांना गाठताना उंच भरारी घेण्याच्या अनेक संधी जगात उपलब्ध आहेत.
नागपूर : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञानाचे आहे. स्वप्नांना गाठताना उंच भरारी घेण्याच्या अनेक संधी जगात उपलब्ध आहेत. गरज आहे ती योग्य मार्गदर्शन आणि उंच झेप घेण्यासाठी स्वत:ला तयार करण्याची. अन् शिक्षणातूनच ‘विंग्ज आॅफ फ्लाय’ मिळू शकतात असे मत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त तसेच ‘सर्च’ संस्थेचे संचालक डॉ.अभय बंग, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय चहांदे व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंभराव्या दीक्षांत समारंभानिमित्त ‘परम’सुपर संगणकाचे निर्माते व संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर यांचा मानद ‘डी.लिट.’ प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ.कलाम यांनी संवादपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नागपूर विद्यापीठ गेल्या ९१ वर्षांपासून देशाच्या जडणघडणीसाठी सेवा देत आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो. याचाच अर्थ नागपूर विद्यापीठाने आतापर्यंत चक्क ९१ वेळा सूर्याला प्रदक्षिणा घातल्या आहेत असे डॉ.कलाम म्हणाले. चांगल्या शिक्षणातून संशोधनाला प्रोत्साहन मिळते.
शिक्षकाचे संशोधनाप्रती असलेले प्रेम आणि त्यांचा अनुभव यामुळे संस्थेचा विकास होता व कुठल्याही संस्थेचा दर्जा हा तेथील संशोधनावरून ठरत असतो. त्यामुळे शिक्षण, संशोधन व दर्जा यांचे एक चक्र आहे असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याने तो खरोखरच कशाकरिता लोकांच्या स्मरणात राहील यासंदर्भात विचार करावा असे आवाहन डॉ.कलाम यांनी केले.
पदवी मिळविल्यानंतर आता जीवनाचा अर्थ शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे. पण स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्याच्या मोठ्या संधीदेखील आहे असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. डॉ.चहांदे यांनीदेखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या व ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले.
प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी १०० व्या दीक्षांत समारंभामुळे विद्यापीठाच्या परंपरेत एक नवा अध्याय जुळल्याचे सांगितले. कोणत्याही विद्यापीठाला भूतकाळात रमणे परवडणारे नसते. नागपूर विद्यापीठ ज्ञानसंपादन व ज्ञाननिर्मितीचे केंद्र बनावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)