नागपूर : दुचाकीने जाणाऱ्या धंतोलीतील एका महिलेचा पाठलाग करून तिचा वारंवार विनयभंग करणाऱ्या आरोपी ऑटो चालकावर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रार करणारी महिला २८ वर्षांची आहे. दुचाकीने जात असताना आरोपी ऑटोचालक विशाल अंबादास चरबे हा नेहमी तिचा पाठलाग करतो आणि वाईट नजरेने बघतो. १ मे पासून त्याचा त्रास सुरू असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन पोलिसांनी शनिवारी आरोपी चरबेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
---
प्लॉटधारकाची फसवणूक
नागपूर : प्लॉटधारकाचे बनावट ओळखपत्र तयार करून चौघांनी त्या प्लॉटची परस्पर विक्री केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जुलै २०१८ ते एप्रिल २०२१ या कालावधीत ही घटना घडली. ज्ञानेश्वर गणपतराव मगर (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी अशोक रामचंद्र वांढरे, पुष्पलता भानुदास लारोकार, दीपक दगडुजी गजभिये आणि वेनूधर दत्तूराम बुरडकर या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---
कर्ज देण्याचे आमिष
नागपूर : आठ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून एका चौकडीने देवानंद अनिल शेंडे नामक व्यक्तीची फसवणूक केली. आरोपी विकास जैन, दीपक चव्हाण, पूजा आणि संजीव कुमार नामक आरोपींनी ३ मार्चला देवानंद शेंडे यांना फोन करून बजाज फायनान्स मुंबई शाखेतून बोलतो असे सांगितले. तुमचे आठ लाख रुपयांचे पर्सनल कर्ज मंजूर झाले आहे, असे सांगून ते मिळवण्यासाठी वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली शेंडे यांच्याकडून आरोपींनी ९८ हजार रुपये हडपले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे शेंडे यांनी शनिवारी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---