पाेलीस शिपायाने केला महिलेवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:15+5:302021-02-10T04:09:15+5:30
नागपूर : एमआयडीसी पाेलीस स्टेशनच्या पाेलीस कर्मचाऱ्याकडून एका महिलेला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना हुडकेश्वर ...
नागपूर : एमआयडीसी पाेलीस स्टेशनच्या पाेलीस कर्मचाऱ्याकडून एका महिलेला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. ही घटना हुडकेश्वर पाेलीस स्टेशनअंतर्गत घडली. बरीच टाळाटाळ केल्यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी आराेपीविराेधात गुन्हा दाखल केला. आराेपी पाेलिसाचे नाव राजकुमार मस्के असे आहे.
मस्के हा एमआयडीसी ठाण्यात कार्यरत आहे. पीडित ५० वर्षीय महिला हुडकेश्वर पाेलीस स्टेशनअंतर्गत परिसरात राहते. त्यांच्या घराखाली त्यांच्या जावयाचे बांधकाम साहित्याचे दुकान आहे. मिळालेल्या माहितीनुसार मस्के हा दुपारी ३ वाजता तेथे आला हाेता. ताे मद्यपान करून असल्याचे सांगितले जात आहे. जावयाचे दुकान बंद असल्याने ताे संतप्त झाला. कारण विचारण्यासाठी ताे महिलेच्या घरी गेला व शिवीगाळ करून गाेंधळ करायला लागला. यावर पीडित महिलेने शिवीगाळ न करण्याची सूचना केली. मात्र तरीही ताे शांत न झाल्याने महिलेने त्याला जाण्यास सांगितले. यावरून त्याने महिलेवर हल्ला करून मारहाण केली. आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लाेक गाेळा झाले, तेव्हा आराेपी मस्के तिथून पळून गेला.
महिलेच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून, ही घटना त्यामध्ये कैद झाली आहे. महिलेच्या कुटुंबियांनी पाेलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नाेंदविली; मात्र हुडकेश्वर पाेलीस तक्रार नाेंदविण्यास टाळाटाळ करू लागले. महिलेस वैद्यकीय तपासणीसाठी खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र खासगी रुग्णालयाने तपासणी करण्यास नकार दिल्याने शासकीय मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. हल्ला करणारा पाेलीस कर्मचारी असल्याचे व त्यामुळेच पाेलीस टाळाटाळ करीत असल्याची बाब लक्षात येताच पीडित कुटुंबियांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर पाेलिसांनी आराेपी मस्केविरुद्ध गुन्हा दाखल करीत चाैकशी सुरू केली. मात्र पाेलिसांच्या या भूमिकेमुळे कुटुंबियांकडून संताप व्यक्त केला जात आहे.