नागपुरात महिलांनी झाडांना बांधल्या इको फ्रेंडली राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:43 PM2019-08-14T22:43:20+5:302019-08-14T22:44:24+5:30
रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा मार्गावरील ‘लिटिल वूड’ येथे ‘महामेट्रो’ आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी रक्षाबंधनाचा अभिनव कार्यक्रम पार पडला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून १०० पेक्षा जास्त महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेत महामेट्रोने लावलेल्या आणि आता फळाफुलांनी बहरलेल्या झाडांना राखी बांधून उत्सव साजरा केला.
भ्रूणहत्या, हुंडाबळी अशा कृतीविरुद्ध लढा देऊन मुलगी वाचवली पाहिजे या विचाराएवढेच ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’ हेदेखील महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने निसर्ग आणि संस्कृतीला रेशमी धाग्यांनी जोडणाऱ्या वृक्ष-रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी महाराष्ट्र लघुउद्योग व हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ‘बेटी बचाव बेटी पढाव’च्या सदस्या व महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
महामेट्रो पर्यावरण संगोपन व संवर्धनाचे कार्य करीत आहे. नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत आहेत. रक्षाबंधन सण महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. नागपूर मेट्रो आणि महिलांमध्ये आपुलकीचे बंध निर्माण होऊन त्यांच्यासोबत अभिनव आणि पर्यावरण पूरक असा उपक्रम घेण्याचा मानस महामेट्रोने पूर्ण केला. लिटिल वूडच्या निसर्ग सौंदर्यपूर्ण वातावरणात पावसाची रिमझिम चालू असताना झाडांना सीडबॉलपासून बनविलेल्या इको फे्रंडली राख्या बांधण्यात आल्या. विविध प्रकारच्या फळाफुलांच्या बियाणांपासून बनविलेल्या सिडबॉलपासून तयार केलेल्या राख्या पावसाने भिजतील आणि त्यातल्या बिया जमिनीवर पडून पुन्हा रुजतील, अशी संकल्पना होती. गेल्या दोन वर्षी दिवसरात्र कार्य करणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याशी भावबंधकीचे जिव्हाळ्याचे नाते जोडले होते.