बेमुदत उपोषण : जिल्हाधिकाऱ्यांना दिले एक हजार सह्यांचे निवेदननागपूर : सहा महिन्यांपासून परिसरात बार उघडणार असल्यामुळे गोधणी रेल्वे येथील महिलांनी त्यास प्रचंड विरोध सुरू केला. सह्यांचे अभियान राबविले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. गोधणी ग्रामपंचायतनेही बार आणि रेस्टॉरंटला नाहरकत प्रमाणपत्र नाकारले. तरीसुद्धा या परिसरात बार सुरू करण्यात आला. यामुळे संतप्त गोधणी रेल्वे ग्रामपंचायत परिसरातील महिलांनी गांधीजयंतीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सहा महिन्यांपूर्वी गोधणी रेल्वे ग्रामपंचायत परिसरात बार उघडण्यात येणार असल्याची माहिती या परिसरातील महिलांना मिळाली. परिसरात बार सुरू झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम आपणास भोगावे लागतील, या भीतीने या परिसरातील महिलांनी बार सुरू होऊ नये यासाठी आंदोलन सुरू केले. त्यांनी एक हजार महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस मुख्यालय, कोराडी पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभागास सादर केले. गोधणी रेल्वे ग्रामपंचायतनेसुद्धा नमो बार व रेस्टॉरंटला नाहरकत प्रमाणपत्र नाकारले. महिलांचे स्वाक्षरी अभियान सुरू असताना त्यांच्या आंदोलनाला आमदार समीर मेघे यांनी भेट देऊन हा बार सुरू होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा बार सुरू करण्यात आला. परिसरात बार सुरू झाल्यामुळे या भागातील महिला संतप्त झाल्या आहेत. त्यांनी २ आॅक्टोबर २०१५ पासून बार हटविण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रामटेक लोकसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदा राऊत यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे घेतले व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. अनेक उपाय करूनही बार हटविण्यासंदर्भात कुठलेच ठोस पाऊल न उचलण्यात आल्यामुळे परिसरातील महिला संतप्त झाल्या आहेत. बार हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतला आहे. आंदोलनात गोधणी रेल्वे ग्रामपंचायतच्या सरपंच शालिनी वाळके, उपसरपंच दीपक राऊत, सदस्य अरुण राऊत, राहुल मनोहर, रवी राऊत, राजू महाजन, रिजाय शेख, रोहित महानंदे, अनिल अतकर, रूपा साबळे, अंजली परतेती, निरंजना राऊत, छाया राऊत, रेणुका लोखंडे, शीला बोबडे, लक्ष्मी सरोदे, रेखा डुकरे, अंजना चंद्रिकापूरे यांच्यासह परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
नमो बारच्या विरोधात महिलांचा एल्गार
By admin | Published: October 16, 2015 3:20 AM