गोरले लेआऊटच्या महिला उतरल्या रस्त्यांवर : प्रशासनाचे लक्ष वेधले नागपूर : दारूची दुकाने हटविण्यासाठी शहरातील गोरले लेआऊटमध्ये महिलांनी एल्गार पुकारला आहे. तरुणींपासून वृद्ध महिलाही या आंदोलनात सक्रिय झाल्या आहेत. प्रशासनाला निवेदने देऊन दारू दुकानाचा प्रश्न न सुटल्यामुळे, आता महिलांनी दारूबंदीसाठी मारू या मरू, असा प्रण घेतला आहे. महिलांची आक्रमकता लक्षात घेता, दारूबंदीचा हा वणवा चांगलाच भडकण्याची शक्यता आहे. जयताळा रोडवरील गोरले लेआऊट येथे चिल्लर देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे गोरले लेआऊट, उज्ज्वल सोसायटी, लोककल्याण सोसायटी, नेल्को सोसायटी, कस्तुरबा लेआऊट, आझाद हिंद नगर, कॉसमास टाऊन या परिसरातील नागरिक त्रस्त आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारूच्या दुकानांना बंदी केल्यामुळे सध्या गोरले लेआऊट येथील दारूच्या दुकानात दारुड्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतो आहे. २००४ पासून हे दुकान सुरू आहे. यापूर्वीही महिलांनी दारूच्या दुकानापासून असलेल्या त्रासाच्या तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या. परंतु कारवाई झाली नाही. पुन्हा परिसरातील महिला आता एकवटल्या आहे आणि ११ एप्रिलपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. सध्या महिलांचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे. दुकानापुढे साखळी आंदोलन, नारे निदर्शने, दुकानांना घेराव, पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस आयुक्त, परिसरातील लोकप्रतिनिधींना त्यांनी निवेदन दिले आहे. परंतु प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होतांना दिसत नाही. उलट दारूबंदीसाठी निवडणुका घेण्याचा प्रशासनाने या महिलांना सल्ला दिला आहे. परंतु महिलांनी प्रशासनाचा सल्ला धुडकावून लावला आहे. काही महिलांना पोलिसांकडून कायदा हातात घेऊ नये म्हणून धमकीवजा नोटीस बजावली आहे. महिलांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळतेय, मात्र प्रशासनाकडून दुजाभाव केल्या जात असल्याचा महिलांचा आरोप आहे. त्यामुळे जोपर्यंत दुकान बंद होणार नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. या आंदोलनात दुर्गा अमिन, समिधी ढोंगे, रेखा ठोमरे, सरोज चौधरी, किशोरी पांडे, श्वेता पावगी, रेखा बिर्ला, प्रणाली मुळीक, तारा लेकुरवाळे, जयश्री बोरकुटे मीना कडू या महिलांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. अशा आहेत महिलांच्या तक्रारी दारुडे रस्त्यावर गाड्या पार्क करतात.रस्त्यावर उभे राहून मोठ्याने शिवीगाळ करतात.सायंकाळी घराबाहेर पडणे कठीण होते. दारूच्या दुकानामुळे अपघात वाढले आहेत. दारुडे लोकांच्या अंगावर धावून येतात.दारुडे परिसरात घाण करतात. उद्यानात उघड्यावर दारू पितात.महिलांकडे वाईट नजरेने बघतात, टाँटिंग करतात.चोऱ्या वाढल्या आहेत.
दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: April 18, 2017 1:40 AM