परप्रांतीय मजूर गावी गेल्याने घरकुलांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:48 PM2020-05-28T14:48:43+5:302020-05-28T14:51:03+5:30
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.
गणेश हूड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा येथील २६४ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात याचे लाभार्थींना वाटप होणार होते. फिनिशिंग व किरकोळ कामे शिल्लक होती. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.
मार्च महिन्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन काही दिवसात संपेल अशी अपेक्षा असल्याने कंत्राटदाराने छत्तीसगड, उत्तरप्रदेश व बिहार येथील मजुरांची व्यवस्था केली होती. मात्र सर्वत्र संसर्गाची भीती परतल्याने मजूर आपल्या गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे गेलेले मजूर लगेच परतण्याची शक्यता नाही. मजुरांना परत आणता यावे यासाठी एनएमआरडीएने कंत्राटदाराला पत्र दिले. मजुरांना परत आणून तातडीने काम सुरू व्हावे, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनएमआरडीएचे कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी दिली. विविध प्रकल्पांसाठी गुजरात व अन्य राज्यांसोबतच मलेशियातून साहित्य आणावयाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे साहित्य आणण्यात अडचणी येत आहेत.
घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात
४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा प्रकल्पातील २६५ घरांचे काम पूर्ण झाले आहे. नळाची लाईन, वीज पुरवठा, गडर लाईन, रस्ते अशा आवश्यक सुविधांची कामे झालेली आहेत. या घरांचे एप्रिल महिन्यात वाटप केले जाणार होते. तरोडी (खुर्द) येथे २३०० आणि ९६०, मौजा वांजरी येथे ७५० घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र मजूर नसल्याने व काही अडचणीमुळे काम रखडले आहे.
लॉकडाऊन कालावधीत बँक हप्त्यांना सवलत
घरकुलासाठी अर्थसाहाय्य घेतेलेल्या लाभार्थींना लॉकडाऊन कालावधीत बँक कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत दिली जाणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर हप्ते भरता येतील. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. वाटपाला विलंब झाला तरी घराच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अन्य विकास कामांनाही फटका
लॉकडाऊनमुळे घरकूल प्रकल्पासोबतच कोराडी तीर्थक्षेत्र विकास (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास (१३२ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षाभूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी प्रकल्पांच्या कामावरील परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. यामुळे काम रखडले आहे.