नागपूर : फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेना यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सच्या एका उच्चपदस्थ शिष्टमंडळाने मंगळवारी महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट दिली आणि नागपूर मेट्रोचे कार्य अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले.
शिष्टमंडळात फ्रान्सचे ओलिविया बेल्मेर (सल्लागार), सोनिया बार्बरी (कॉन्सेल जनरल), जॅकी एम्प्रू (प्रादेशिक संचालक-दक्षिण आशिया आणि ब्रुनो बोल (संचालक-कंट्री) उपस्थित होते. मेट्रो भवनमधील अनुभव केंद्र आणि बॅकअप ऑपरेशनल कंट्रोल सेंटरला (बीओसीसी) शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
शिष्टमंडळाने हिंगणा मार्गावरील लिटिल वूडला भेट दिली आणि येथील सेफ्टी पार्कची पाहणी केली, तसेच लिटिल वुड ते वासुदेवनगर मेट्रो स्टेशनपर्यंत महामेट्रोची फिडर सेवा ई-रिक्षाने आणि शिष्टमंडळाने अॅक्वा लाइन मार्गावर वासुदेवनगर ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवाशांसोबत प्रवास केला. त्यांच्यासमोर सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे विस्तृत सादरीकरण करण्यात आले. शिष्टमंडळाने मेट्रोच्या इतरही प्रकल्पांना भेट दिली. महामेट्रोने शहरात चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण संवर्धनाकिरता सोलर पॅनलसारखे उपकरण मेट्रो स्टेशन येथे लावले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले आहे. मेट्रोमुळे शहराच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे. यावेळी दीक्षित यांनी फ्रान्सच्या राजदूतांना नागपूर मेट्रोचे मॉडेल व महाकार्ड भेट दिले.