आनंद डेकाटे/कमल शर्मा
नागपूर : राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाला आहे. आता केवळ शेवटच्या टप्प्यातील लहान-सहान कामे सुरू आहेत. या महामार्गावरून वाहने गतीने धावूसुद्धा लागली आहेत. आता केवळ महामार्गाच्या लोकार्पणाचीच प्रतीक्षा आहे.
येत्या १ मे राेजी या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ चमूने गुरुवारी समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉइंट शिवमडकापासून वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथील ड्रायपोर्टपर्यंतच्या महामार्गाची पाहणी केली असता संपूर्ण महामार्ग वाहनांसाठी तयार असल्याचे दिसून आले. केवळ लहान-सहान कामे सुरू आहेत. वाहने या महामार्गावरून गतीने धावू शकतात.
अशा आहेत महत्त्वपूर्ण बाबी
एंट्री पॉइंटचे सौंदर्यीकरण - शिवमडका चौक
उड्डाणपूल - ४
मोठा पूल - १
लहान पूल - १८
गती - १२० किलोमीटर प्रति तास
बुटीबोरीतही एंट्री पॉइंट
शिवमडका येथील एंट्री पॉइंटला भव्यदिव्य स्वरूप दिले जात आहे. येथील भव्य चौकाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. येथील एक रस्ता वर्धा रोड तर दुसरा हिंगणाकडे जातो. चौकाच्या मध्ये वृक्षारोपण केले जात आहे. एक लॉनसुद्धा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दुसरा एंट्री पॉइंट १६ किलोमीटर दूर अंतरावर बुटीबोरी येथे आहे. एक सर्व्हिस रोड बनवून या महामार्गाला बुटीबोरीशी जोडण्यात आले आहे. या सर्व्हिस रोडचे काम अजूनही सुरू आहे. वाहतूक मात्र सुरू आहे.
वायफळमध्ये टोल प्लाझा
बुटीबोरी एंट्री पॉइंटच्या जवळ असलेल्या वायफळ येथे महामार्गावर पहिला टोल प्लाझा आहे. येथे शौचालय आदींची व्यवस्था केली आहे. शिवमडका येथून ११.५ किमी अंतरावर असलेल्या या टोल प्लाझाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. नागपूर व वर्धा जिल्ह्यातील हा एकमेव टोल प्लाझा आहे जो महामार्गावर आहे. सिंदी रेल्वे येथील टोल प्लाझा सर्व्हिस रोडवर आहे.
वन्य प्राण्यांसाठी ओवरब्रिज
शिवमडकापासून १६ किलोमीटर अंतरावर वन्य प्राण्यांसाठी एक ओवरब्रिज तयार केला जात आहे. येथे एक डोम तयार केले जात आहे. येथे काँक्रिट आणि पुन्हा पाच मीटर मातीचा थर टाकला जाईल. येथे वृक्ष लावले जातील. वन्यप्राण्यांना जंगलातूनच जात असल्याचे वाटेल. ते याचा वापर करून महामार्ग सहजपणे पार करू शकतील.
वर्धा रोडवरून महामार्ग
शिवमडका येथील एंट्री पॉइंटपासून २६ किमी अंतरावर समृद्धी महामार्ग वर्धा रोडला पार करतो. वर्धा रोडवरील महामार्गाचा उड्डाणपूल तयार झाला आहे. पुढे सिंदी ड्राय पोर्टला सर्व्हिस राेडने जोडण्यात आले आहे.