जागतिक वारसा हक्क दिन: कसा जपणार नागपुरातील ऐतिहासिक वारसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:42 AM2018-04-18T10:42:57+5:302018-04-18T10:43:14+5:30
विदर्भासह नागपूर अशा ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. परंतु त्याचे संरक्षण आणि सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष असल्याची बाब दिसून येते.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऐतिहासिक वास्तू या आपल्या देशाचा इतिहास आणि संस्कृती ही पुढच्या पिढीला समजण्याचे आणि समजावून सांगण्याचे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. यांच्यामुळेच देशाचा इतिहास व संस्कृती टिकून राहते. या वास्तू म्हणजे देशाचा वारसा असतात, म्हणून त्यांचे संरक्षण आवश्यक असते. यांच्या संरक्षणासाठी शासनस्तरावर अनेक संस्था कार्यरत आहेतही. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. विदर्भासह नागपूर अशा ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. परंतु त्याचे संरक्षण आणि सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष असल्याची बाब दिसून येते.
नागपूर शहराचाच विचार केला तर शहरात एकूण १५५ ठिकाणे ही हेरिटेज साईट म्हणून घोषित आहेत. यापैकी काही मोजक्या इमारती सोडल्या तर सर्वांची अवस्था अतिशय दयनीय आहे. शहरात अंबाझरी, तलाव, पांढराबोडी तलाव, कस्तूरचंद पार्क, झिरो माईल, रेल्वे स्टेशन, जुनी उच्च न्यायालयाची इमारत, विविध मंदिर, चर्च आदींचा यात समावेश आहे. महाल भागात जवळपास ३१ आणि सीताबर्डी परिसरात १७ ठिकाणे ही हेरिटेज साईट आहेत. यातील बहुतांश शासकीय इमारती असून, शासकीय कार्यालये आहेत. ते सोडले तर इतरांची स्थिती फारशी चांगली नाही. कस्तूरचंद पार्क आणि झिरो माईल या दोन ऐतिहासिक वास्तू तर शहराची ओळख आहे. परंतु आज त्यांची स्थिती दयनीय आहे. झिरो माईलचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या माईलच्या मुख्य स्तंभाला भेगा पडल्या आहेत. झिरो माईलची ओळख असलेल्या घोड्यांचे पाय तुटले आहेत. अशीच परिस्थिती इतर वास्तूंचीही आहे.या दोघांचाही विकासाचा आराखडा तयार आहे. परंतु सध्या तरी ते दुर्लक्षितच आहे. इतरांचा तर विकासाचा विषयच नाही. शासन व प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.
हेरिटेज वास्तूंचे डॉक्युमेन्टेशन तयार
मनपाच्या हेरिटेज संवर्धन समितीच्यावतीने श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज आॅफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी शहरातील हेरिटेज साईटचे संपूर्ण डॉक्युमेन्टेशन केले आहे. शहरात एकूण १५५ हेरिटेज साईट नोटीफाय करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक माहिती, फोटो, स्थळ आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या माहितीचे डॉक्युमेन्टेशन करण्यात आले आहे. मनपाच्या हेरिटेज मितीच्या साईटवर ते उपलब्ध आहे. त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा आराखडाही देण्यात आल्याचे सांगितले जाते.
ऐतिहासिक मंदिरांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नागपूर शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. हेरिटेज कमिटीच्या यादीतही ते आहेत. त्यचे डॉक्युमेंटेशन झालेले आहे. त्यामुळे नेमका काय दुरुस्ती करायची आहे, याची माहितीही आहे. परंतु समितीच्या बैठकीत मंदिरांच्या देखभाल दुरुस्तीच्या विषयावर कधी चर्चाच होतांना दिून येत नाही, अशी माहिती समितीच्या सुत्रांकडून मिळते. या मंदिरांची दुरुस्ती झाल्यास शहरातील वैभवात भर पडेल, असेही सांगितले जाते.
हेरिटेज कमिटीकडे असावा स्वतंत्र निधी
हेरिटेज कमिटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा संवर्धन समितीकडे जिल्ह्यातील हेरिटेज वास्तूचे संरक्षण व संवर्धन करण्याचे अधिकार आहेत. पण ते करण्यासाठी स्वतंत्र असा निधी नाही. त्यासाठी मनपा, नासुप्र यांच्यावर अवलंबून राहावे लागते. विविध विभागांचा त्यात समावेश असल्याने एखाद्या वास्तूची तातडीने दुरुस्ती होण्यास विलंब होतो किंवा त्याकडे दुर्लक्ष होते म्हणून समितीकडे स्वतंत्र निधी असावा. तसेच समितीमध्ये तज्ज्ञ सदस्यांचा जास्तीत जास्त समावेश होण्याची गरजही असल्याचे सांगितले.