जागतिक परिचारिका दिन; समर्पण भावनेने रुग्णसेवा देत, त्यांनीही घडविले डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2023 08:00 AM2023-05-12T08:00:00+5:302023-05-12T08:00:06+5:30

Nagpur News ज्या डॉक्टरांच्या हाताखाली आपण काम करतो ते हात कधीकाळी आपल्या मुलांचे असावेत हे स्वप्न उराशी बाळगून असतात. काहींना यात यशही येते. जागतिक नर्सिंग दिनाच्या निमित्ताने त्यातील काहींवर टाकलेला हा प्रकाश.

World Nurses Day; Serving patients with dedication, he also became a doctor | जागतिक परिचारिका दिन; समर्पण भावनेने रुग्णसेवा देत, त्यांनीही घडविले डॉक्टर

जागतिक परिचारिका दिन; समर्पण भावनेने रुग्णसेवा देत, त्यांनीही घडविले डॉक्टर

googlenewsNext

सुमेध वाघमारे

नागपूर : प्रत्येक नात्यात व्यवहार शोधणाऱ्या आजच्या काळात नोकरीही फारच व्यावसायिक पद्धतीने केली जाते. परंतु नोकरीचे काही क्षेत्र असे आहेत ज्याच्या सेवेला नजरेआड करताच येत नाही. नर्सिंग हे त्यातलेच एक क्षेत्र. नर्सेस आपल्या समर्पण भावनेने कर्तव्य बजावतात. रुग्णांचा जखमेवर मलम लावण्यासोबतच त्यांच्या मनावरच्या घावावर फुंकरही घालतात. ही बांधीलकी आणि नि:स्वार्थ कठोर परिश्रम करीत असताना आपल्या घरासाठी त्या वेळ काढतात. आपल्या मुलांना घडविण्यासाठी तेवढेच परिश्रम घेतात. ज्या डॉक्टरांच्या हाताखाली आपण काम करतो ते हात कधीकाळी आपल्या मुलांचे असावेत हे स्वप्न उराशी बाळगून असतात. काहींना यात यशही येते. जागतिक नर्सिंग दिनाच्या निमित्ताने त्यातील काहींवर टाकलेला हा प्रकाश.

-मला होता आले नाही, म्हणून मुलीला केले डॉक्टर-कल्पना वसुले

मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागातील शस्त्रक्रियागृहातील इंचार्ज सिस्टर असलेल्या कल्पना वसुले यांनी अथक परिश्रमातून आपल्या मुलीला डॉक्टर घडविले. त्यांची मुलगी अदिती वसुले हिने शासकीय दंत महाविद्यालयातून ‘बीडीएस’ची पदवी घेतली. सध्या ती पदव्युत्तर शिक्षण ‘एमडीएस’ची तयारी करीत आहे. ‘लोकमत’शी बोलताना कल्पना वसुले म्हणाल्या, मला डॉक्टर व्हायचे होते. परंतु परिस्थितीमुळे नाही होता आले. मुलीने डॉक्टर व्हावी ही इच्छा होती. मुलगी अदिती लहानपणापासून हुशार होती. नर्सिंग कामाचा थकवा बाजूला ठेवत, वेळात वेळ काढून तिच्या अभ्यास घ्यायची. आज ती डॉक्टर झाली याचे मोठे समाधान आहे.

-मुलाने वैद्यकीय सेवेत यावे हे स्वप्न होते - राखी मेश्राम

मेडिकलमध्ये स्टाफ नर्स असलेल्या राखी मेश्राम यांचा मुलगा शिवम मेश्राम हा रशिया येथून ‘एमबीबीएस’ शिक्षण घेत आहे. हे त्याचे शेवटचे वर्ष आहे. ‘लोकमत’शी बोलताना वंशिता मेश्राम म्हणाल्या, रुग्णांची सेवा करताना घराकडे लक्ष देणे कठीणच. परंतु कितीही थकले असलेतरी मुलाच्या अभ्यासात मदत करायची. मुलाने वैद्यकीय सेवेत यावे हे स्वप्न होतेच. त्यालाही आई करीत असलेली मेहनत दिसून यायची. यामुळे त्याने जिद्दीने अभ्यास केला. आम्हा दोघांचेही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे.

-मुलाकडूनही रुग्णसेवा व्हावी ही इच्छा होती-ज्योत्स्ना तडस

मेयोमध्ये मागील २०वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिपरिचारिका ज्योत्स्ना तडस यांचा मुलगा मयूर तडस ह्याने नुकतेच ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो इंटर्नशिप करीत आहे. ‘लोकमत’शी बोलताना ज्योत्स्ना तडस म्हणाल्या, माझ्या हातून जी रुग्णसेवा घडत आहे, तीच सेवा मुलाच्या हातून घडावी ही इच्छा होती. परंतु ही इच्छा त्याच्यावर लादली नाही. परंतु रुग्णसेवेत मला मिळत असलेला आनंद त्याने ओळखला असावा. त्याने अभ्यास केला, मेहनत घेतली. वेळात वेळ काढून त्याला मदत करायची. मयूर डॉक्टर झाला याचा सार्थ अभिमान आहे.

-मुलाकडूनही रुग्णसेवा घडेल हा अभिमान -स्मिता शिंदे

मेडिकलमध्ये २२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या स्टाफ नर्स स्मिता निर्मले-शिंदे यांचा मुलगा सुयश अकोला मेडिकलमधून ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत आहे. ‘लोकमत’शी बोलताना स्मिता निर्मले-शिंदे म्हणाल्या, सध्या मी मेडिसीन कॅज्युअल्टीमध्ये सेवा देत आहे. रुग्णसेवा देताना जो आनंद मिळतो तो कुठल्याच सेवेत नाही. पैसा सर्वच कमवितात परंतु सेवा देऊन पैसा कमविणे हे वेगळेच. मुलालाही हे कळले असावे, आणि त्या दृष्टीने त्याने मेहनत घेण्यास सुरुवात केली. आता माझ्यासोबत मुलाच्या हातूनही रुग्णसेवा घडेल याचा अभिमान आहे.

Web Title: World Nurses Day; Serving patients with dedication, he also became a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य