वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल : जैविक खते आता बायो कॅप्सूलच्या रूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:45 PM2019-01-18T23:45:49+5:302019-01-18T23:53:46+5:30
दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंबई व एसआरटी अॅग्रो सायन्स छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित पेटन्टेड बायो कॅप्सयूल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाईसेस रिसर्च या संस्थेने प्रमाणित केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेत ते अॅग्रोकमल या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डोममध्ये असलेल्या कृषी उद्योग विकास मंडळाच्या स्टॉलवर हे बायो कॅप्सूल शेतकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. त्यामुळे पिकांना जमिनीद्वारे मिळणारी मूलद्रव्ये मिळत नाही. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधुनिक नॅनो टेक्नोलॉजीवर आधारित बायो कॅप्सूल आणले आहे.
एका बायो कॅप्सूलमध्ये एक कोटी जीवाणू आहे. ते सर्व प्रकारच्या पिकांसाठी व फळांसाठी उपयुक्त आहे. यामुळे एक एकर शेतात एक बायो कॅप्सूल पुरेसे आहे. या कॅप्सूलमुळे जमिनीची पोत सुधारते, पिकांच्या गुणवत्तेत वाढ होऊन उत्पादनाचा खर्च कमी होतो. जमिनीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढून पोत सुधारते. बायो कॅप्सूल वापरामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जैविक असल्यामुळे निसर्गाचे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत होते. मुळांची वाढ होऊ कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपलब्ध मूलद्रव्ये योग्य प्रमाणात शोषली जातात.
सहा कॅप्सूलची एक स्ट्रीप ३५० रुपयाला उपलब्ध आहे. कृषी उद्योग महामंडळाचे रुपेश दिगळे, भागवत सोमवन आणि जयश्री पाटील हे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.