नागपूर: सध्या कोरोनाच्या काळात वाहतूक कमी झाल्याने हवेचे प्रदूषण कमी झाले आहे. परिणामी ओझोनच्या ऱ्हासाला काही अंशी आळा बसला आहे व ओझोन होलमध्ये सुधारणा झाली आहे. कोरोनाच्या निराशाजनक पार्श्वभूमीवर ही एक आशादायक घटना आहे..
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचे प्रमाण दरवर्षी आठ टक्क्यांनी कमी होत आहे. ओझोनच्या या ऱ्हासाला कारणीभूत असणारे मुख्य प्रदूषक म्हणजे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, हॅलोन्स आणि मिथील ब्रोमाईड. ही रासायनिक संयुगे एअर कंडिशनर व रेफ्रिजरेटर्स तयार करण्याच्या कारखान्यातून आणि किटकनाशकांच्या फवारणीतून वातावरणात मिसळली जातात. जी पुढे घातक ठरतात.पृथ्वीच्या वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण दहा मिलीग्रॅम प्रति किलो असते. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाश किरणांत अल्ट्रा व्हायोलेट ए आणि बी किरणांचा समावेश असतो. अल्ट्रा व्हायोलेट बी किरणे सजीवांच्या दृष्टीने घातक असतात. वातावरणातील ओझोन वायू ही घातक किरणे शोषून घेऊन पृथ्वीवरील सर्व सजीवांचे रक्षण करतो म्हणून ओझोन वायूच्या थराला ओझोनची संरक्षक छत्री म्हटले जाते.
सध्या अंटार्टिकावर एक व पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात युरोप आणि उत्तर अमेरिकेवर दुसरे ओझोन होल तयार झालेले आहे. सूर्यप्रकाशतील अल्ट्रा व्हायोलेट बी किरणांमुळे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्सचे विघटन होऊन क्लोरीन अणू तयार होतो. तसेच हॅलोन्स व मिथील ब्रोमाईडचे विघटन होऊन ब्रोमीन अणू तयार होतो. क्लोरीन व ब्रोमीन अणू शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ वातावरणात टिकून राहतात व लाखो ओझोन रेणूंचे विघटन घडवून आणतात. या घातक गुणधर्मामुळे क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स, हॅलोन्स व मिथील ब्रोमाईड यांना ओझोन भक्षक म्हटले गेले आहे.ओझोनच्या ऱ्हासामुळे वनस्पती, प्राणी व मानवावर अनेक घातक परिणाम होत आहेत. त्यातील मानवी त्वचेमध्ये बॅसल पेशी, स्क्वॅमोज पेशी व मेलॅनोसाईटस अशा वेगवेगळ्या पेशी असतात. सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट बी किरणे त्वचेवर सतत पडल्यास या पेशींच्या कार्यात बिघाड होऊन बॅसल सेल कॅन्सर, स्क्वॅमोज सेल कॅन्सर, व मेलॅनोमा असे तीन प्रकारचे त्वचेचे कॅन्सर उद््भवतात. त्यामुळे त्वचेवर काळे पट्टे, खाज सुटणे, दाह होणे, पुरळ उठणे आदी विकारांनी माणूस त्रस्त होतो. अशा विकारांना बळी पडणाºया रुग्णांची स्ख्या दरवर्षी दुपटी तिपटीने वाढते आहे.
ओझोनचा ऱ्हास असाच होत राहिल्यास, भविष्यकाळात संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होण्याचा धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी ओझोन वायूचे रक्षण करणे हाच एक अंतिम उपाय आहे. त्यासाठी जगातील २४ राष्ट्रांनी एकत्र येऊन दि. १६ सप्टेंबर १९८७ रोजी मॉँट्रियल करार केला होता. या कराराची व ओझोन संरक्षक छत्रीची आठवण म्हणून जागतिक ओझोन दिवस १६ सप्टेंबरला पाळला जातो.डॉ. सुनील विभुते (लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)