जागतिक त्वचा आरोग्य दिन; गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 09:56 AM2018-04-06T09:56:46+5:302018-04-06T09:56:56+5:30
गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण अनेकविध उपाय करीत असतो. त्यातल्यात्यात गोरे बनविण्याचा दावा करणारी भरपूर उत्पादने आज उपलब्ध आहेत, पण ती उत्पादने वापरणे योग्य आहेत का, त्यांच्या वापराने खरोखरच रंग गोरा होतो का, की त्याचे इतर काही दुष्परिणाम तर त्वचेवर होत नाहीत ना, अशा अनेक प्रश्नांना त्वचा तज्ज्ञांना सामोरे जावे लागते. गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे.
सुंदर व निरोगी त्वचा म्हणजे गोरा रंग, असे समीकरण सध्या रूढ होत चालले आहे. यातच प्रतिष्ठित सिनेतारका जाहिरातींद्वारे कोणत्याही क्रीमचा प्रचार करतात तेव्हा या गैरसमजाला दुजोरा मिळत आहे. परिणामी, डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच स्टेरॉईडसारख्या क्रीमचा सर्रास वापर होत असल्याने दिवसेंदिवस त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असल्याचे ‘आयएडीव्हीएल’चे म्हणणे आहे.
प्रीस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांची उलाढाल मोठी
‘आयएडीव्हीएल’चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. विक्रांत सावजी म्हणाले, प्रीस्क्रिप्शनशिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांची उलाढाल ही कोट्यवधीच्या घरात आहे. नूतन कायद्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली गेली तरच हा अनैतिक, अप्रामाणिक आणि अनारोग्यपूर्ण व्यवसाय रोखला जाईल. मात्र तसे होण्याऐवजी फक्त स्टेरॉईड्सच नव्हे तर त्याच्याबरोबर इतर घातक द्रव्यांचे मिश्रण असलेली नवीन क्रीम्स बाजारात आली आहेत. ती घातक ठरत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिले तरच या औषधांची विक्री केली गेली पाहिजे.
क्रिम्सचे दुष्परिणाम झाल्यानंतरच डॉक्टरांकडे धाव
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे म्हणाले, त्वचारोगतज्ज्ञाकडे येण्यापूर्वीच बहुतांश रुग्ण क्रिम्स आणि लोशन्सचा मारा आपल्या चेहऱ्यावर करतात. त्यामुळे त्वचेचे साधे विकारही उपचार करण्यासाठी कठीण बनतात. अशा क्रिम्सचे दुष्परिणाम झाल्यामुळे त्वचारोगतज्ज्ञांकडे धाव घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत चालली आहे. त्वचा पातळ होणे हा अशा क्रिम्सचा भयानक दुष्परिणाम आहे.
स्टेरॉईड्स असलेल्या क्रीम्समुळे भयावह आजार - डॉ. पिंपळे
‘आयएडीव्हीएल’चे सदस्य डॉ. आशिष पिंपळे यांच्या मते, नवीन संशोधनानुसार काही स्टेरॉईड्स असलेल्या क्रीम्स गोरे बनविण्याबरोबरच भयावह आजारांना आमंत्रण देत आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांत गोरे होण्याच्या जाहिरातीपासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे. कारण, बाह्य उपयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईड असलेल्या सर्व औषधांना सरकारने ‘एच’ या वर्गवारीत टाकले आहे आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ती मिळू नयेत, असा कायदाही करण्यात आला आहे; शिवाय त्यांची जाहिरातही केली जाऊ नये, असा नियम आहे. यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.