मेहा शर्मा
नागपूर : क्षयराेग हा जगातील सर्वाधिक जीवघेणा आजार आहे आणि भारत हा जगात सर्वाधिक टीबी रुग्णसंख्या असलेला देश आहे. देशात दर ६ मिनिटाला एक असे दिवसाला २४० व्यक्तींचा क्षयराेगाने मृत्यू हाेताे.
२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे. यात ६१.७ टक्के पुरुष रुग्ण आहेत. त्यातही १५ ते ३० वयाेगटातील रुग्णांची संख्या ३८ टक्के, तर ५.६५ टक्के मुलांचा समावेश आहे.
पाहणीनुसार २०१९ साली २३,२८,३३८ क्षयराेग रुग्णांची नाेंद झाली. ८२ टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार झाले तर मृत्युदर ४ टक्के हाेता. ३ टक्के रुग्णांवर उपचार सुरू करूनही अपयश आले तर ९ टक्के रुग्णांचे मूल्यांकन केले गेले नाही. तज्ज्ञांच्या मते, भारत क्षयरोगात आघाडीवर असण्यामागे बरीच कारणे आहेत. पल्मोनोलॉजी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मते साथीच्या रोगाला आळा घालण्यात असमर्थ असण्याची अनेक कारणे आहेत. ४० टक्के भारतीय संसर्गाच्या संपर्कात आहेत, परंतु प्रतिकारशक्तीमुळे ते वाचले आहेत.
आजाराच्या प्रसारामध्ये सामाजिक-आर्थिक कारणे महत्त्वाची आहेत. गजबजलेल्या भागात, झोपडपट्ट्यांमध्ये संसर्ग वेगाने हाेताे. मद्यपी, धूम्रपान करणारे लाेक क्षयरोगाच्या औषधांना प्रतिसाद देत नसल्याने उपचार कठीण होतात. सरकारच्या याेजनानंतरही टीबीचे निर्मूलन हाेऊ शकले नाही, कारण प्रभावित क्षेत्राची ओळख करण्यात येत नाही, त्यामुळे रुग्ण पुन्हा संसर्गात येतात.
फिजिशियन डाॅ. हेमंत छाजेड यांच्या मते समाजातील खालच्या स्तरापर्यंत पाेहोचण्यासाठी घराेघरी जाऊन तपासणीचा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. रुग्णांनी काळजी घेतल्यास टीबी निर्मूलन शक्य आहे. आपल्याला मृ्त्यूचा आकडा गंभीरतेने घेण्याची गरज आहे. त्यासाठी काेराेनासारखी आक्रमक माेहीम राबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नाेंदविले.