सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मृत्यूदर कमी करण्यासाठी प्लाज्मा थेरपी फार प्रभावी नाही, असे विधान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकतेच केले. यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारात नागपूरच्या मेडिकलमधून सुरू केलेला जगातील सर्वात मोठा 'प्रोजेक्ट प्लॅटिना' (प्लाज्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) अडचणीत आला आहे. तूर्तास सुरू असलेल्या या प्रकल्पावर 'आयसीएमआर'ने कुठलेही निर्देश दिले नाही. तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प सुरूच राहणार आहे.
'कोविड-१९'वर जगात कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. या भीषण परिस्थितीत रुग्णाच्या उपचारात 'प्लाज्मा थेरपी'ने एक नवीन उमेद जागविली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तत्कालीन सचिव डॉ. संजय मुखर्जी व संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'प्रोजेक्ट प्लॅटिना' चाचणी राबविण्यास पुढाकार घेतला. प्रकल्पाची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) देण्यात आली.
या प्रकल्पांतर्गत राज्यातील २३ रुग्णालयांमध्ये ही चाचणी सुरू करण्यात आली. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या ४७२ रुग्णांवर चाचणी केली जाणार होती. यामुळे जगातील पहिला व सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला गेला. दरम्यान, वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूला रोखण्यासाठी 'प्रोजेक्ट प्लॅटिना'अंतर्गतच 'प्लाज्मा आॅफ लेबल' सुरू करण्यास मंजुरीही देण्यात आली. असे असताना, रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे 'आयसीएमआर'ने पत्रपरिषदेत म्हटले. तसेच एखाद्या कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर होत असेल तर, त्याची प्रकृती बिघडण्यापासून रोखण्यातही प्लाज्मा थेरपीचा वापर प्रभावी ठरत नसल्याचे आपल्या अभ्यासाद्वारे स्पष्ट केले.'प्रोजेक्ट प्लॅटिना' सुरूच राहणार'प्रोजेक्ट प्लॅटिना' ही 'रिसर्च ट्रायल' आहे. यामुळे हे थांबवू शकत नाही. या संशोधनाच्या निष्कषार्नंतरच यावर काही बोलता येईल. परंतु 'आयसीएमआर' प्रोजेक्ट प्लॅटिनाअंतर्गत सुरू असलेले 'प्लाज्मा ऑफ लेबल' बंद करण्याचे निर्देश येऊ शकतात.-डॉ. एम. फैजलप्रभारी व स्टेट नोडल अधिकारी 'प्रोजेक्ट प्लॅटिना'