‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ ठरणार नागपूरची शान; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:53 PM2017-12-09T22:53:36+5:302017-12-09T22:55:22+5:30
नागपूरच्या संत्र्यांची निर्यात वाढविण्यासाठी तसेच त्यांचे ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, जीआय मानाकंन वाढावे आणि येथील संत्र्यांची चव जगात पोहचविण्यासाठी नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे. हा फेस्टिव्हल नागपूरची शान ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर, : नागपूरच्या संत्र्यांची निर्यात वाढविण्यासाठी तसेच त्यांचे ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, जीआय मानाकंन वाढावे आणि येथील संत्र्यांची चव जगात पोहचविण्यासाठी नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्यात येत आहे. हा फेस्टिव्हल नागपूरची शान ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूरमध्ये १६ ते १८ डिसेंबर २०१७ या कालावधीत ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या आयोजनासंबंधी शनिवारी ऊर्जा, उत्पादनशुल्क तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर विकास प्रादेशिक प्राधिकरणाचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक हनुमंत हेडे, कृषी सहसंचालक (पुणे) विजय घावटे, प्रज्ञा गोडघाटे, नागपूर ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे, महावितरणचे मुख्य अभियंता रफिक शेख आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून संत्रा उत्पादकासह शेतकऱ्यांना संत्र्यांविषयी माहिती करून घेण्यासाठी संधी प्राप्त होत आहे. नागपूरच्या संत्र्यांची चव जगात पोहचविण्यासाठी हा महोत्सव निश्चितच फायदेशीर ठरेल. संत्र्यांचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी, बाजारपेठ मूल्य, सादरीकरण यावर तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागपूर व विदर्भातील काही भागात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन होते. नागपूर हे संत्र्यासाठी ओळखले जाते. मात्र या संत्र्याला बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी योग्य व्यासपीठाची गरज आहे. हे व्यासपीठ या फेस्टिव्हलमध्ये मिळेल असे बावनकुळे यांनी सांगितले.
या महोत्सवाला व्यापक स्वरूप देण्यासाठी संपूर्ण विदर्भात संत्र्याच्या विकासासंदर्भात कार्य करणाऱ्या संघटना, संस्था यांना वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सामावून घेण्यात यावे. जेणेकरून याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना घेता येईल आणि त्यांना उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय प्रयत्न करता येईल, याबाबत माहिती मिळेल. शासनस्तरावरुन वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलला लागणारी रोषणाई, आतषबाजी याबाबत परवानगी देण्यात यावी. शासकीय यंत्रणांनी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करावे. तसेच देश-विदेशातील पर्यटकांनी या महोत्सवाकडे आकर्षित होण्यासाठी टूर्स आणि ट्रॅव्हर्ल्स आॅपरेटरशी संपर्क साधून या महोत्सवाची प्रसिद्धी करण्यात यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन नागपुरी संत्र्याच्या अस्तित्वासाठी, महत्त्व वाढीसाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले. यावेळी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल आयोजन समितीच्यावतीने कार्यक्रमाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले.
संत्रा उत्पादकांना फायदा होईल : अनुप कुमार
विभागीय आयुक्त अनुप कुमार म्हणाले, जगाच्या बाजारपेठेत नागपुरी संत्री पोहचविण्यासाठी त्याचे ब्रँडिंग, माकेर्टिंग आणि व्हॅल्यू अॅडिशन होणे आवश्यक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून नागपुरी संत्र्याची मागणी वाढून याचा फायदा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होईल. यंदाचे या महोत्सवाचे पहिले वर्ष आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांना संत्रा उत्पादन संगोपन, व्यवस्थापन, निर्यात याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. संत्रानगरी नागपुरात वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल होत आहे ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
१६ डिसेंबर रोजी सुरेश भट सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. शहरात विविध ठिकाणी आॅरेंज फेस्टिव्हलच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये संगीत कला, मनोरंजन, खाद्य पदार्थांची रेलचेल यांचा समावेश राहणार आहे. नामांकित कलाकार आपली कला येथे सादर करतील. जे.जे.स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथील विद्यार्थी शहरातील विविध ठिकाणी संत्र्यांशी संबंधित माहितीपट कार्यक्रम राबवतील. यूपीएल लि. हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. तर महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य लाभले आहे. हे लोकमत इनिशिएटिव्ह आहे. या महोत्सवात विदर्भ, महाराष्ट्रासह, पंजाब, आंध्रप्रदेश, मणिपूर आदी राज्यांसह इस्रायल, टर्कीमधूनही संत्रा उत्पादक शेतकरी आणि तज्ज्ञ या महोत्सवात सहभागी होतील. संत्र्यांचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी याबाबत ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशासन लागले कामाला, अमरावती विभागाची १३ ला बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासनच कामाला लागले आहे. नागपूर विभागाची बैठक शनिवारी पार पडली. अमरावती विभागाची बैठक येत्या १३ तारखेला होणार आहे. यासंबंधात स्वत: पालकमंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कृषी विभागाची १२ रोजी बैठक
या महोत्सवासाठी नागुरातील संत्रा उत्पादकांसह जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित राहावे, त्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य सरकारचा कृषी विभाग तसेच जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक १२ डिसेंबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्याचे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
रावल, येरावार यांनी केले आश्वस्त
पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार हे काही कारणांनी बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या दोन्ही मंत्र्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी फोनवर चर्चा केली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असे दोन्ही मंत्र्यांनी आश्वस्त केले.