डबडबल्या डोळ्यांनी शहीद गोवारी बांधवांना नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 09:07 PM2019-11-23T21:07:43+5:302019-11-23T23:52:33+5:30
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरलेल्या ११४ गोवारी बांधवांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त झिरो माईल चौकातील शहीद स्मारकाचा परिसर शनिवारी गोवारी बांधवांच्या गर्दीने भरला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो गोवारी बांधवांनी त्या अमानवीय घटनेच्या स्मृतींना उजाळा देत न्यायाच्या लढाईत शहीद झालेल्या बांधवांना डबडबल्या डोळ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्या घटनेनंतर न्याय हक्काच्या लढाईला २५ वर्षे लोटल्यानंतरही बांधवांना न्यायाची प्रतीक्षा कायम असल्याची खंत त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.
१९८५ चा काळा जीआर रद्द करावा आणि गोंडगोवारीच्या मध्ये केवळ ‘कॉमा’ टाकून समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी गोवारी बांधवांनी २३ नोव्हेंबर १९९४ ला हिवाळी अधिवेशनावर लाखोंचा मोर्चा काढला होता. सरकारचा कोणताही प्रतिनिधी भेटायला न आल्याने सायंकाळपर्यंत थांबलेल्या मोर्चात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांचे बळी गेले आणि असंख्य जखमी झाले. त्या बांधवांच्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव गोवारी शहीद स्मारकाजवळ जमा होतात. तसे ते यावर्षीही आले. सकाळपासून गावोगावच्या लोकांनी येथे भेट देत साश्रू नयनांनी शहीद बांधवांना आदरांजली वाहिली. यावर्षी २५ वा स्मृतीदिन असल्याने लोकांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
विविध सामाजिक, राजकीय संघटना, संस्थांचे कार्यकर्ते स्मृतीस्थळावर जमा झाले होते. यात महाविद्यालयीन तरुणांचा समावेश अधिक होता. धामणगाव रेल्वे परिसरातील गावांमधून आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाच्या माध्यमातून ५०० गोवारी बांधवांनी येथे भेट दिली. याशिवाय आदिवासी गोवारी युनिटी ट्रस्ट संघटनेशी जुळलेल्या गावोगावच्या विद्यार्थ्यांनी दुपारी ४ वाजता स्मारकाभोवती मानवी साखळी करीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भोजनदानासह पुस्तक व विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन केंद्रासह २५ प्रकारचे स्टॉल स्मारक परिसरात लागले होते. सामाजिक संस्थांनीही यावेळी बांधवांना सेवा दिली.
२५ वर्षापूर्वी झालेल्या मोर्चातील चेंगराचेंगरीतून सुखरुप बचावलेले, जखमी झालेले तसेच शहीद झालेल्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने शहीद गोवारी स्मारकावर उपस्थित झाले होते. प्रत्यक्ष त्या मोर्चाचे साक्षीदार असलेले, ज्यांनी आपल्या बांधवांच्या शवाचे थर पाहिले, त्या क्षणांची आठवण करीत अनेकांचा हुंदका दाटून येत होता. सायंकाळपर्यंत आदरांजली वाहण्याचा हा सिलसिला स्मारकावर चालला होता. दिवस मावळताच हे गोवारी बांधव आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले.
न्याय अद्याप बाकी असल्याची खंत
२५ वर्षे लोटली तरी ज्या मागणीसाठी हे हत्याकांड झाले ती मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत श्रद्धांजलीसाठी आलेल्या बांधवांनी व्यक्त केली. राज्य सरकारने विशेष मागास प्रवर्गामध्ये ४० उच्च जाती टाकून गोवारी जमातीला मूळ आदिवासींपासून भटकविले. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बलांना, गोरगरिबांना कोणताच शासकीय लाभ होत नाही. घरकुल योजना, बेरोजगारांना बँक कर्ज, नोकरीमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांकरिता शासकीय सवलत मिळत नाही. त्यामुळे समाजातील विद्यार्थी, युवक बेरोजगारांची थट्टा केली जात असल्याचा समाजाचा आरोप आहे. गोवारी जमातीला एससी किंवा एसटीप्रमाणे कोणत्याही प्रकारची शासकीय योजना नाही. त्यामुळे गोवारी जमात ही सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासापासून कोसो दूर असल्याची समाजाची भावना आहे. गोंडगोवारी ही बोली भाषा आहे. ‘गोंड’ व ‘गोवारी’ वेगळ्या जमाती आहेत. २००२ पर्यंत गोंड-राजगोंड अशी अनुसूचीमध्ये नोंद होती. राज्य शासनाने शिफारस करून लोकसभेत दुरुस्ती विधेयक आणले. गोंड-राजगोंडमध्ये कॉमा टाकला. त्याप्रमाणे ‘गोंडगोवारी’ मध्येही कॉमा टाकण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशी समाजाची मागणी आहे. जोवर ही दुरुस्ती होणार नाही, तोवर समाजाला न्याय मिळणार नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.