नागपुरातील यादव कुटुंबीयातील हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:56 PM2018-02-07T22:56:41+5:302018-02-07T22:58:34+5:30
भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या २१ आॅक्टोबर रोजी रात्री झालेल्या हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या २१ आॅक्टोबर रोजी रात्री झालेल्या हिंसक भांडणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.
अवदेश यांच्या पत्नी नविता यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका प्रलंबित असताना शासनाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने शासनाचे पत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावरील सुनावणी एक आठवडा तहकूब केली. तसेच, याचिकाकर्तीला शासनाच्या निर्णयावर पुढच्या तारखेला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. अवधेश यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अर्जुन यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३०७, ३२३, ३२४, ३२५, १४१, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुन्ना यादव यांचे बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्यामुळे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न होत आहेत. पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. प्रकरणाचा चुकीच्या पद्धतीने तपास केल्या जात आहे असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.