यमराज आणि चित्रगुप्त चक्क नागपुरात; वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांना समजावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:21 PM2018-08-13T15:21:24+5:302018-08-13T15:21:50+5:30
डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डोक्यावर हेल्मेट घातले नाही, कार चालविताना सीट बेल्ट लावले नाही आणि वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुमचा मृत्यु अटळ आहे. हे सांगण्यासाठी चक्क यमराज आणि त्यांचा सहकारी चित्रगुप्त हे आज सोमवारी थेट नागपुरात अवतरले आणि चौका-चौकामध्ये फिरू लागले. हेल्मेट न घातलेला मोटरसायकल स्वार आणि सीटबेल्ट न लावलेला कारचालक दिसला की, हे दोघे त्यांच्याजवळ जात. चित्रगुप्त त्यांच्या चुकांचा हिशोब मांडत होते तर यमराज संबंधित वाहनचालकांना दम देत होते. सोमवारी वर्दळीच्या सीताबर्डी चौकातील जनजागृती अभियानाच्या या दृश्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मेट्रो रेल्वेचे काम करणाऱ्या नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाºयांनी शहरातील विविध चौकात हे जनजागृती अभियान राबविले. या अभियानामध्ये स्वप्नील बनकर यांनी यमराजाची वेषभूषा तर राहुल नागोडे यांनी चित्रगुप्ताची वेषभूषा धारण केली. त्यांच्यासह इतर कार्यकर्ते वाहनचालकांना स्वत:च्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. अभियानात सुरक्षा व्यवस्थापक सोम शेखर, सुरक्षा अधिकारी विजय मिश्रा, मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे मुख्य सुरक्षा तज्ज्ञ स्वामीनाथन, सुनील हरिचंदन, राजेश दांडेकर आदींचा सहभाग होता.