लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात मुलाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकणाऱ्या आईची जन्मठेप व इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील आहे.
सविता शालिग्राम भारंबे (४७) असे आरोपी आईचे नाव असून ती कोकटा, ता. खामगाव येथील रहिवासी आहे. सविताच्या पहिल्या नवऱ्याचे २३ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले. त्यानंतर तिचे शेजारच्या एका व्यक्तीसोबत सुत जुळले. त्याच्यापासून ती गर्भवती झाली. जानेवारी-२००१ मध्ये तिने गोंडस मुलाला जन्म दिला. दरम्यान, ती त्या मुलाची वैरीण झाली. तिने समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी त्या नवजात मुलाचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ७ जून २००६ रोजी सत्र न्यायालयाने सविताला जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध पुरावे लक्षात घेता ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.