विचार तर कराल ! लग्नकार्यात चोरीसाठी भाड्याचे नातेवाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:20 AM2020-02-18T06:20:53+5:302020-02-18T06:21:21+5:30
मध्य प्रदेशातील गाव; आई-बाबा, काकू, भाऊ अन् अल्पवयीनही उपलब्ध
नरेश डोंगरे
नागपूर : जगात सर्व काही मिळते मात्र आईबाबा मिळत नाही, असे म्हणतात. मात्र, मध्यप्रदेशात एक गाव असे आहे, जेथे मामा, मावशी, काका, काकू, भाऊ अन् आई-बाबाही मिळतात. भाड्याने व माफक दरात! अर्थात चोरी करण्यासाठी ! राजगड जिल्ह्याच्या पचोर तालुक्यातील छोट्या गावाचे नाव आहे, कडिया सांसी. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गावातील बहुतांश मंडळीचा व्यवसाय आहे चोरी करणे. तरुण मंडळी चोरीचे कटकारस्थान करतात अन् वयस्क मंडळी त्यांना चोरीसाठी तसेच चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करतात.
राहिली छोटी मंडळी. पण सात-आठ वर्षांच्या चिमुरड्यांचे चोरीचे कसब तोंडात बोटे घालायला लावणारे आहे. या गावातील चार जण नागपूर पोलिसांच्या हाती लागले. त्यातील एक १४ वर्षांचा आहे. एक २६, दुसरा ३२ वर्षांचा आहे. तर, काकू ४५ वर्षांच्या आहेत. २६ वर्षीय मोहित महेंद्रसिंग आणि ३२ वर्षीय सन्नी छायल छोट्या मुलांना चोरीसाठी तयार करतात.
मोठ्या शहरात हे बिनबुलाये मेहमान छान ब्लेझर, वेस्ट कोट अन् चकचकीत कपडे घालून मोठ्या हॉटेल्स, सेलिब्रेशन हॉल, लॉन्समधील लग्न समारंभात शिरतात. वर-वधूच्या बाजुला त्यांना मिळणारे पैशाची पाकिट वगैरे कोण जमा करतो. वर-वधूचे आईवडील, भाऊबहिण बॅग (पर्स) घेऊन मिरवतात, त्यांनाही हे मोठे हेरतात अन् इशाऱ्यानेच लहानग्याला सांगतात. त्यानंतर लहान मुलगा संधी मिळताच रोख रक्कम, दागिन्यांची पर्स उचलतो अन् वेगात तेथून बाहेर पडतो.
असे होते ‘कमाई’चे वाटप
बाहेर असलेले त्याचे कथित भाऊ ही मुद्देमाल ताब्यात घेतात अन् मिनिटांतच परिसरातून दूर निघून जातात. तारांकित हॉलमधील लग्न म्हटले की किमान दोन तीन लाखांचा ऐवज मिळतोच.
भाड्याने आई म्हणून आणलेल्या
महिलेला त्यातील ५ ते १० हजार आणि तेवढीच रक्कम चोरीत महत्त्वाची भूमिका वठविणाºया लहान मुलाला (त्याच्या
आई-वडिलांना) दिली जाते.