‘आत्मनिर्भर’! अभियंता तरुणाने निवडला पाेहे विक्री व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 09:15 AM2021-06-07T09:15:51+5:302021-06-07T09:16:14+5:30
Nagpur news उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील छोट्याशा गावातील अभियंता झालेल्या तरुणाच्या वाट्यालासुद्धा असाच कटू अनुभव आला. काय करावे, काय नाही अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता पाेहे विक्रीचा व्यवसाय त्याने निवडला.
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली. असंख्य बेरोजगारांनाही याची झळ सोसावी लागली. अनेक वर्षांपासून मोठ्या शहरात, महानगरात नाेकरीच्या निमित्ताने स्थिरावलेल्या असंख्य तरुणाईने कोरोनाच्या संकटकाळात ‘घरवापसी’ केली. यापैकी बहुतांश तरुण ‘वर्क फॉर्म होम’मध्ये गुंतले असून, अनेकांना नाेकरी गमवावी लागली. उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील छोट्याशा गावातील अभियंता झालेल्या तरुणाच्या वाट्यालासुद्धा असाच कटू अनुभव आला. काय करावे, काय नाही अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता पाेहे विक्रीचा व्यवसाय त्याने निवडला. निखिल तानबाजी राऊत असे या तरुणाचे नाव आहे. कोरोनामुळे नाेकरी गेली असली तरी छोटाशा व्यवसायातून ‘आत्मनिर्भर’तेची वाटचाल केल्याचा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
निखिल राऊतने मराठी माध्यमातून आपले दहावीपर्यंतचे शिक्षण सिर्सी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यालयात पूर्ण केले आहे. त्यानंतर नूतन आदर्श महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला. उमरेड ओम पॉलिटेक्निक येथे पॉलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील सूर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअर बनला.
अशातच कॅम्पस मुलाखतीतून सन २०१९ ला हैद्राबाद येथील एका कंपनीत नाेकरी मिळाली. अत्यंत गरीब परिस्थिती. त्यातच सुमारे दहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन, अशा कठीण चक्रात असताना मिळालेली नाेकरी स्वप्नपूर्तीची पावतीच ठरणारी होती. अशातच कोरोनाचे वादळ आले. नाेकरी गमवावी लागली. हैद्राबाद येथून उमरेडकडे परतीचा प्रवास करावा लागला.
उमरेड येथे आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्याने मोहपा चौक परिसरात रस्त्याच्या कडेला पाेहे विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. यात चंद्रशेखर वाघमारे यांनी मोलाची मदत दिली. मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असले तरी अशा परिस्थितीत मिळेल ते मेहनतीने काम करायला कमीपणा कसला. निदान खर्च वजा जाता आम्ही आनंदाने जगू शकतो, हे बळ मला या छोट्याशा उद्योगातून मिळाल्याची प्रतिक्रिया निखिलने व्यक्त केली. यामध्ये आई यमुना यांची हिंमत लाखमोलाची असल्याचीही बाब त्याने सांगितली.
रणरणत्या उन्हात ‘घरवापसी’
मे २०२० ला नाेकरी गेल्यानंतर हैद्राबाद येथून निखिल दोन अन्य मित्रांसमवेत नागपूरच्या दिशेने पायीच पायपीट करीत निघाला. तीन दिवस, तीन रात्र पोटात अन्नाचा कण नाही. केवळ पाणी आणि नारळपाणी याचाच पोटाला आधार घेत निखिलने रणरणत्या उन्हात खडतर प्रवास केला. त्यानंतर अदिलाबाद ते नागपूर असा प्रवास ट्रकच्या माध्यमातून करीत तो उमरेड येथे पोहोचला. हा प्रसंग व्यक्त करताना त्याने दाखविलेली हिंमत अंगावर काटा आणणारीच आहे.