किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

By नरेश डोंगरे | Published: August 25, 2022 04:07 PM2022-08-25T16:07:46+5:302022-08-25T16:13:33+5:30

अकोल्याच्या तरुणाचा मृत्यू, बुटीबोरीजवळ घडली घटना

young man thrown off from a running train after fight over a small reason | किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

Next

नागपूर : अकोला येथील तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर काही आरोपींनी एका तरुणाला धावत्या रेल्वे गाडीतून खाली फेकले. त्यामुळे शेख अकबर नामक अकोल्याच्या तरुणाचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ८.२० च्या सुमारास बुटीबोरी ते गुमगाव रेल्वे ट्रॅकवर ही थरारक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील काही तरुण  बाबा ताजुद्दीन यांच्या नागपूर येथे सुरू असलेल्या ऊर्समध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी ५.३० च्या सुमारास गरीब रथ या ट्रेनमध्ये बसले. रेल्वे गाडीच्या जनरल डब्यात दाराजवळ हे सर्व तरुण दाटीवाटीने उभे होते. सकाळी ८ च्या सुमारास रेल्वे गाडी बुटीबोरी जवळ आली असताना शेख अकबर याचा दुसऱ्या गटातील तरुणाला पाय लागला. त्यावरून शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला.

हा वाद एवढा वाढला की आरोपी तरुणांनी शेख अकबरला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. अनेकांसमोर ही घटना घडली. मात्र रेल्वे गाडीत मोठी गर्दी असूनही  रेल्वे गाडीची चेन ओढून गाडी थांबविण्याचे प्रसंगावधान कुणी दाखवले नाही. दरम्यान गाडी नागपूरच्या अजनी स्थानकावर आल्यानंतर अकबरच्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वे पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला.

बरीच शोधाशोध केल्यानंतर रेल्वे लाईनच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो शेख अकबरच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले. दुपारी साडेतीन वाजता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

Web Title: young man thrown off from a running train after fight over a small reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.