सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यात मागील लाटेच्या तुलनेत या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे, आता मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. एकट्या मेडिकलमध्ये मार्च महिन्यात २१ ते ४० वयोगटांत ५३ तर एप्रिल महिन्यात याच वयोगटात १७१ तरुण रुग्णांचे बळी गेले आहेत. यामुळे तरुणांनो, कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वयस्कर नागरिकांना अधिक होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाचा संसर्ग जीवघेणा ठरतो. हे खरे असले, तरी वस्तुस्थिती बदलत असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ज्येष्ठांसोबतच तरुणांमध्येही वाढत आहे. तज्ज्ञाच्या मते, कोरोना विषाणूमध्ये झालेला बदल यामागील एक कारण आहे. सोबतच ४५ वर्षांवरील लोकांचे होत असलेले लसीकरण, त्यांच्या कोरोनाविषयी असलेली गंभीरता, यामुळे प्रतिबंधक उपाययोजनाचे ते पालन करतात. त्या तुलनेत तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत चांगली असते, असा समज असल्याने काही तरुण मास्क, सॅनिटायझेशनचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नियम टाळतात, शिवाय लक्षणांकडेही दुर्लक्ष करतात. गंभीर झाल्यावरच रुग्णालयात येत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
-मार्च महिन्यात ३१ ते ४० वयोगटांत ४१ मृत्यू
मार्च महिन्यात मेडिकलमध्ये २१ ते ३० वयोगटांत १२ तर ३१ ते ४० वयोगटांतील ४१ असे एकूण ५३ रुग्णांचे बळी गेले, याशिवाय ४१ ते ५० वयोगटांतील ६०, ५१ ते ६० वयोगटांतील ९०, ६१ ते ७० वयोगटांतील ९८ तर ७० व त्यापुढील वयोगटांतील ८६ रुग्णांचे मृत्यू झाले.
-एप्रिल महिन्यात ३१ ते ४० वयोगटांत ११९ मृत्यू
मेडिकलमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाले. १,३६७ मृत्यूची नोंद झाली. यात सर्वाधिक मृत्यू ५१ ते ६० वयोगटांतील आहेत. यातील ३१७ रुग्णांचे बळी गेले आहेत, परंतु मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात तरुणांमध्ये मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. २१ ते ३० वयोगटांत ५२ तर ३१ ते ४० वयोगटांत ११९ असे एकूण १७१ रुग्णांचे बळी गेले आहेत.
-तरुणांच्या मृत्यूचे कारण
:: उशिरा निदान
:: उपचारातही उशीर
:: निदान न झालेला मधुमेह, उच्च रक्तदाब
:: हायपो-थायरॉयडिझम
:: लठ्ठपणा
कोरोनाबाधित तरुणांच्या मृत्युमागे उशिरा निदान व उपचारातही उशीर हे मुख्य कारण प्राथमिक स्तरावर आढळून आले आहे, याशिवाय निदान न झालेला मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशा कारणांमुळे कोरोनाबाधित तरुणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. तरुणांनी घराबाहेर पडताना मास्कचा योग्य वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशनचा वापर व सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.
-डॉ. प्रशांत पाटील
विभाग प्रमुख मेडिकल