कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 02:19 PM2022-01-17T14:19:22+5:302022-01-17T14:35:56+5:30
नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बाधितांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाची जेव्हा पहिली लाट आली तेव्हा बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. परंतु दुसऱ्या लाटेत तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना यात लहान मुलांची संख्या अधिक असणार असे म्हटले जात होते. परंतु मागील १५ दिवसांत बाधित रुग्णांचे वयोगट पाहता १६ ते ३० वयोगटात तीन हजार ९९१ तर ३१ ते ५० वयोगटात चार हजार ७८२ असे एकूण आठ हजार ७७३ तरुण बाधित आढळून आले आहेत.
- शून्य ते १५ वयोगटात ६ टक्के रुग्ण
मागील १५ दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या बारा हजार ७२८ रुग्णांमधून शून्य ते १५ वयोगटात ८२४ बाधित मुले आढळून आली. याचे प्रमाण ६.४७ टक्के आहे. यात मुलांची संख्या ४६०, तर मुलींची संख्या ३६४ आहे. विशेष म्हणजे, १३ जानेवारी रोजी सर्वाधिक म्हणजे, १४७ बाधित मुलांची नोंद झाली.
- १६ ते ३० वयोगटात बाधितांचे प्रमाण ३१ टक्के
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधातही युवक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. मागील १५ दिवसांत आढळून आलेल्या १६ ते ३० या वयोगटात बाधितांचे प्रमाण ३१.३५ टक्के आहे. तीन हजार ९९१ तरुण-तरुणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. यात दाेन हजार २६७ तरुण असून, एक हजार ७२४ तरुणी आहेत.
- ३१ ते ५० वयोगटात ४,७८२ रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३१ ते ५० वयोगटात बाधितांची संख्या सर्वाधिक होती. तिसऱ्या लाटेतही मागील १५ दिवसांत याच वयोगटातील रुग्णांची संख्या इतरांच्या तुलनेत अधिक आहे. चार हजार ७८२ रुग्णांची नोंद झाली आहे. याचे प्रमाण ३७.५७ टक्के आहे. यात पुरुषांची संख्या दोन हजार ९२० तर महिलांची संख्या एक हजार ८६२ आहे.
- ५१ वर्षे वयोगटात २४ टक्क्यांहून अधिक रुग्ण
आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ५१ वर्ष व त्यापुढील वयोगटात बाधितांची संख्या २४.५९ टक्के आहे. तीन हजार १३१ रुग्ण आढळून आले आहेत. यात एक हजार ८५९ पुरुष असून, एक हजार २७२ महिला आहेत. विशेष म्हणजे, १३ ते १५ जानेवारीदरम्यान ४५० ते ५०० दरम्यान रुग्णांची नोंद झाली आहे.