युथ एम्पॉवरमेंट समिट : दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:50 AM2020-02-16T00:50:23+5:302020-02-16T00:51:40+5:30
फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फॉर्च्युन फाऊंडेशनतर्फे आयोजित सहाव्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीसुद्धा तरुणांचा मोठा उत्साह दिसून आला. शनिवारी तब्बल पाच हजारावर तरुण-तरुणींच्या मुलाखती पार पडल्या. अशाप्रकारे दोन दिवसात विविध कंपन्यांनी १५ हजारावर मुलाखती घेतल्या. यातून १४८६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसात ३३९ जणांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.
शनिवारी तब्बल ९,५०० तरुण-तरुणी समिटमध्ये सहभागी झाले होत्या. यापैकी पाच हजारावर लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी ७१० जणांची विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. ४१ कंपन्यांचे ८० एच.आर. यांनी मुलाखती घेतल्या. दोन दिवसात १५ हजारावर मुलाखती पार पडल्या आहेत. कंपन्यांना ज्या उमेदवारांची तातडीची गरज आहे आणि ज्यांनी मुलाखत योग्यपणे यशस्वी केली आणि सर्व कागदपत्र सादर केले त्यांना लगेच नियुक्तीपत्र दिले जात आहे. तर ज्यांचे सिलेक्शन झाले पण काही कागदपत्र सादर झालेले नाही. तसेच कंपनीच्या नियमानुसार त्यांना थेट कंपनीत गेल्यावर जॉईंन करण्यात येणार आहे. जॉईंन करून घेण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला १० ते १५ दिवसांचा पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे.
मुलाखतीसोबतच विविध मार्गदर्शनपर सत्रही पार पडले. पहिले मार्गदर्शनपर सत्र पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर होते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी पर्यावरण संवर्धन क्षेत्रात रोजगार आणि संबंधित क्षेत्रातील संधी याविषयी विस्तृत माहिती दिली. पॅरिस करारात भारत सहभागी झाल्यापासून, पर्यावरण संवर्धन ही भारत सरकारची प्रमुख मोहीम झाली असल्याने केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. या क्षेत्रात स्वयंरोजगारासह केंद्र तथा राज्य पातळीवरील प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर कॉपोर्रेट कंपन्यांमध्ये नोकरीची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राचा विस्तार मोठा असून, या संधींचा अभ्यास करून लाभ घेण्याचे आवाहन चॅटर्जी यांनी उपस्थित युवकांना केले.
याशिवाय, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी या विषयावर आशिष कोले यांनी तर विमा क्षेत्रातील संधींविषयी आयुर्विमा निगम अर्थात एलआयसीचे विकास अधिकारी अभिषेक शुक्ला यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आमदार अनिल सोले यांच्यासह इतर पदाधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.
थेट नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारही भारावले
युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून येतो. हजारो उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. प्रत्येक दिवशी उमेदवारांना एसएमएस करून बोलावले जात आहे. दोन दिवसात १५ हजारावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अनेक उमेदवारांचे सिलेक्शन झाले. कालच ऑनलाईन अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्रही मिळाल्याने उमेदवारही भारावले होते. सिलेक्शन झालेल्या काही उमेदवारांशी लोकमतने यावेळी संवादही साधला. यात कमल येंडे हा तरुण गोंदियाचा रहिवासी आहे. त्याने पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे. पुण्यातील फोर्ज कंपनीत त्याचे सिलेक्शन झाले. त्याला लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याने तो भारावला होता. कालच अर्ज केला. आज मुलाखत झाली आणि लगेच नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल त्याने आश्चर्यही व्यक्त केले. याचप्रकारे वर्धा येथील शिवानी श्याम चांभारे हिने बीई केले आहे. तिची पुण्यातील बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीत निवड झाली. वर्धा येथीलच आफरीन नाझ अली हिचीसुद्धा बीव्हीजी इंडिया लि. कंपनीत निवड झाली. तिला वडील नाही. आई हाऊसवाईफ आहे. मोठी बहीण शिक्षिका आहे.
एक नव्हे तीन-तीन कंपन्यांमध्ये सिलेक्शन
या समिटमध्ये एका उमेदवाराला एक नव्हे तर पाच विविध कंपन्यांसाठी मुलाखती देण्याची संधी होती. यातील अनेकांचे एकापेक्षा अधिक कंपन्यांमध्ये सिलेक्शन झाले. नागपूरच्या अनघा महाकाळकर आणि प्रचिता उपाते या तरुणींची एक नव्हे तर तीन-तीन कंपन्यांमध्ये निवड झाली. दोन्ही तरुणींनी बी.ई. (टेलि कम्युनिकेशन) केले आहे. या दोघोंचीही बीव्हीजी, जेबील आणि वरॉक या पुण्यातील कंपन्यांमध्ये निवड झाली. इतकेच नव्हे तर त्यांना सिलेक्शन लेटरही प्रदान करण्यात आले.
आज समारोप
या युथ एम्पॉवरमेंट समिटचा उद्या रविवारी समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशीही जवळपास १० हजार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.