अध्यक्षा निशा सावरकर यांचे संबोधन : कौतुकाच्या सोहळ्यात निषेधाचा सूर नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जि.प. अध्यक्षा निशा सावरकर यांनी शिक्षकांनाच मूर्ख संबोधले. त्यामुळे अध्यक्षांच्या वक्तव्यावर शिक्षकांनी संताप व्यक्त करीत पुरस्कार वितरण सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमातच निषेध केला. कौतुकाच्या सोहळ्याला आरोपाचे गालबोट लागल्याने अख्ख्या शिक्षकांमधून निषेधाचा सूर उमटला. सोमवारी नागपूर जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद (मा.शा.) हायस्कूल काटोल रोड येथे करण्यात आले होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांबरोबर संपूर्ण जिल्ह्यातून हजारोच्या जवळपास शिक्षक या सोहळ्याला उपस्थित होते. दुपारी १२ वाजता होणारा सोहळा तब्बल अडीच ते तीन तास उशिरा सुरू झाला. त्यातच अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भाषणे लांबली. त्यामुळे पुरस्कार वितरणाला खऱ्या अर्थाने ४ वाजता सुरुवात झाली. १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा ग्रुप फोटो काढणे सुरू होते. हे सुरू असताना काही शिक्षक सभागृहाच्या बाहेर पडले. निवेदिकेने अध्यक्षांचे भाषण व्हायचे आहे, आपण आपल्या जागी बसून घ्यावे असे आवाहन केले. त्यानंतर अध्यक्ष निशा सावरकर यांचे भाषण सुरू झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘शिक्षक मूर्ख आहेत. त्यांना तारतम्यच नाही’ असे बोलून शिक्षकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या वक्तव्यानंतरही शिक्षकांनी शांतपणे भाषण ऐकून घेतले. अध्यक्षांनी शिक्षकांचा अपमान केला जिल्हा परिषदेने या सत्कार सोहळ्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही. पुरस्काराच्या नावावर पाच तास शिक्षकांना ताटकळत ठेवले. फोटोसेशन सुरू असताना थोडी उसंत मिळाल्यामुळे काहीच शिक्षक पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले. अध्यक्षांनी संतापण्याचे काहीच कारण नव्हते. शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्यात त्यांनाच मूर्ख संबोधून अध्यक्षांनी शिक्षकांचा अपमान केला आहे. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्याचा शिक्षकांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महा. राज्य प्राथमिक शिक्षक संघ
...म्हणे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मूर्ख !
By admin | Published: September 20, 2016 2:31 AM