जि.प. निवडणुकीचा पारा चढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:09+5:302021-03-26T04:10:09+5:30
कुही : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुही तालुक्यातील राजोला जि.प. सर्कल व सिल्ली व तारणा पं.स. गणातील ओबीसी प्रवर्गातून विजयी ...
कुही : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुही तालुक्यातील राजोला जि.प. सर्कल व सिल्ली व तारणा पं.स. गणातील ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द झाले. आता या सर्कल व गणात पुन्हा निवडणूक होणार असल्याने आरक्षण सोडतीननंतर राजकीय वातावरण तापायला लागले आहे. त्यामुळे येथे राजकीय पक्ष जुन्याच उमेदवारांना संधी देतात की नवीन उमेदवार मैदानात उतरवितात याकडे लक्ष लागले आहे. राजोला जि.प. सर्कल, सिल्ली व तारणा गण २०२० मध्ये ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने राजोला सर्कलमध्ये भाजपचे बालू ठवकर, सिल्ली पं. स. गणात भाजपच्या वैशाली भुजाडे, तर तारणा पं.स. गणात काँग्रेसचे संदीप खानोरकर विजयी झाले होते. या सदस्यांचे पद रद्द झाले असले तरी त्यांना नव्या आरक्षण सोडतीमुळे पुनश्च निवडणूक लढण्यासाठी संधी आहे. कारण येथील आरक्षण आता सर्वसाधारण गटासाठी असून सिल्ली गण महिलेसाठी राखीव आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजोला सर्कलचे माजी जि.प. सदस्य बालू ठवकर यांनी नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय गत निवडणुकीत पक्षांतर्गत झालेली बंडखोरी यावेळी टाळत एकजुटीने लढत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या वेळी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अरुण हटवार यावेळी ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भागेश्वर फेंडर हेसुद्धा ही जागा लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी व बसपा ही उमेदवार उभे करू शकतात.
तारणा पंचायत समितीत काँग्रेसचे संदीप खानोरकर हे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. न्यायालयाच्या निकालाने त्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे ते पुन्हा निवडणूक लढतील. त्यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक भाजपचे सरपंच पराग तळेकर निवडणूक लढतील; परंतु मागील वेळी बसपा समर्थित उमेदवार परमानंद शेंडे यांनी जोरदार टक्कर दिली होती. यांच्या त्रिकुटात यावेळी कोण बाजी मारणार, हे प्रत्यक्ष निवडणूक झाल्यावरच कळेल. सिल्ली पं.स. गणात भाजपच्या वैशाली भुजाडे विजयी झाल्या होत्या. येणाऱ्या निवडणुकीत जुन्यासह काही तरुण चेहरे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, वंचित बहुजन आघाडीतून तिकीट मिळविण्यासाठी जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात आहेत. तालुक्यातील सध्याची राजकीय समीकरणे पाहता आगामी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.