नांदेड : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नांदेड शहरात पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर असले तरी, धर्माबादेत मात्र पेट्रोलच्या दराने शुक्रवारी शंभरी ओलांडली होती. या ठिकाणी पेट्रोलसाठी १०० रुपये २९ पैसे, तर डिझेलसाठी ८९ रुपये ६३ पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे शेजारील तेलंगणामध्ये मात्र पाच रुपयांनी इंधन स्वस्त आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. दररोज काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. नांदेडात हे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत, तर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या धर्माबादेत मात्र पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. नांदेडला सोलापूर येथील डेपोतून इंधन पुरवठा केला होता. सोलापूर ते धर्माबाद हे अंतर सर्वात जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. पर्यायाने पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेत अधिक महाग मिळते. शेजारील तेलंगणामध्ये हैदराबाद येथून इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पाच रुपये कमी दराने पेट्रोल मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईतही वाढ झाली आहे.
पेट्रोलियम पदार्थावर एकूण नऊ प्रकारचा टॅक्स राज्यात मुंबई, मनमाड, धुळे, अकोला, चंद्रपूर, खापरी, सोलापूर या ठिकाणांहून पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाते. पेट्रोलियम पदार्थावर एकूण नऊ प्रकारचा टॅक्स लावला जातो. त्यात रिडक्शन ऑदर्स, आरपीओ फॅक्टर (रिटेल किंमत आणि त्यातील तफावत), लोकल ट्रान्सपोर्ट चार्जेस (जर पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोलपंप १० किमीच्या आत असेल तरीही तेवढाच टॅक्स त्या पंपाला द्यावा लागतो), ट्रार्न्स्पोटेशन चार्ज (जर पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोलपंप १० किमीपेक्षा जास्त असेल तर लोकल ट्रार्न्स्पोटेशन चार्जेस व १.७५ पैसे प्रतिलीटर आकारले जातात.) साधारणत: एक टँकर १२ हजार लीटरचा असतो. ऑदर लिव्हाईज (पेट्रोल वितरण केंद्रापासून पेट्रोलपंपापर्यंत जे टोल नाके लागतात त्याचा यात समावेश असतो.) एआर व्हॅट (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा तब्बल २५ टक्के आहे), सरचार्ज ऑन सेल टॅक्स (विक्री करावरील अधिकचा कर), लायसन्स फी रिकव्हरी (पेट्रोलपंपाचे जे डेकोरेशन केले जाते तो हा टॅक्स आहे.) एलबीटी, जकात, स्थानिक कर याचा यात समावेश असतो.