धर्माबाद : धर्माबाद पालिका अध्यक्षांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी ५ मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय घेवून तशी नोटीस सभागृहाच्या दरवाजावर डकविली. त्यामुळे उपस्थित नगरसेवक संतापले व त्यांनी सभागृहाबाहेर सर्वसाधारण सभा घेवून नगराध्यक्षांच्या कृतीचा निषेध केला आणि नियोजित सभेतील विषय नामंजूर केले. एकूणच पालिकानाट्याचा विषय आज चर्चेचा बनला होता. धर्माबाद पालिकेत असे नाट्य पहिल्यांदाच घडले.नगराध्यक्षा अफजल बेगम यांंनी ५ मार्च रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा ठेवली होती. सदरील सभेच्या विषयपत्रिकेत २८ विषय होते. यात प्रामुख्याने विविध प्रभागांतील विविध योजनेतंर्गंत कोट्यवधींच्या निविदांना मंजुरी द्यायची होती. इतरही काही महत्त्वाचे विषय होते. या कामातील ‘दक्षिणे’वरुन नगराध्यक्ष , नगरसेवक यांच्या वाद झाला आणि तब्येतीचे कारण पुढे करत नगराध्यक्षांनी नियोजित सभाच रद्द करण्याचा निर्णय घेवून तशी नोटीस पालिका सभागृहाच्या दरवाजावर डकविली. दुसरीकडे नगराध्यक्षा मनमानी कारभार करतात, असा आरोप करीत राष्टÑवादीचे ४, काँग्रेसचे २, भाजपाचे ४, बसपा, सपा प्रत्येकी १ नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार केला आणि या सर्वांनी पालिकेच्या बंद सभागृहाबाहेर स्वतंत्र सभा घेवून नगराध्यक्षांच्या विषयपत्रिकेवरील विषयांना नामंजूर करण्याचा ठराव घेतला. नगराध्यक्षा अफजल बेगम, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे संगनमत असून, ते मनामानी कारभार करीत आहेत. आम्हाला बोलू दिले जात नाही, विकासाची कामे रखडली आहेत. लवकरच आचारसंहिता लागणार असल्याने जाणीवपूर्वक सभा रद्द करण्यात आली. केवळ आर्थिक मलिदा लाटण्यासाठी हा सर्व प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप १२ नगरसेवकांनी केला.१२ नगरसेवकांच्या सभेचे अध्यक्ष म्हणून बांधकाम सभापती निलेश पाटील बाळापूरकर, उपाध्यक्ष म्हणून नगरसेवक भोजराम गोणारकर यांनी काम पाहिले. या सभेत विषय पत्रिकेतील काही विषय मंजूर केले व काही विषय नामंजूर केले. सदरील मंजूर केलेले विषय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असून मंजूर केलेल्या विषयांना जिल्हाधिकारी मंजुरी देतील काय? याकडे शहरातील जनतेचे लक्ष वेधले आहे. या सभेला नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व अधीक्षक अनुपस्थित होते. सभेस सभापती निलेश पाटील बाळापूरकर, नगरसेवक साय्यारेड्डी गंगाधररोड, सुनीता जाधव, भोजराम गोणारकर, युनूस खान, साधना सुरकुटवार, संजय पवार, कविता बोल्लमवार, रूपाली पाटील बाळापूरकर, अहेमदीबेग आबेदअल्ली, नजीमबेगम म. आजम, माधाबाई वाघमारे हे १२ नगरसेवक उपस्थित होते.धर्माबाद नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता असली तरीही अंतर्गत वादामुळे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे दहा, काँग्रेसचे नगराध्यक्ष व दोन नगरसेवक, भाजपाचे चार, सपाचे एक, बसपा एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे़ राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष नगरसेवकांत फूट पडली असल्याने राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे दोन, भाजपाचे चार, बसपा एक, सपा एक असे १२ नगरसेवक मिळून एक गट निर्माण झाला.
माझी तब्येत अचानक बिघडल्याने ५ मार्चची सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली. तशी नोटीस उपनगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांकडे ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता फिरविण्यात आली. सभा रद्द करण्यास विरोध करणाऱ्या १२ नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला, म्हणजेच पत्र स्वीकारले नाही. सभा रद्द करण्याचा मला अधिकार आहे- अफजल बेगम अ. सत्तार, नगराध्यक्षा, धर्माबाद पालिकासभा रद्द करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे. तसे पत्र सर्व नगरसेवकांनाही देण्यात आले होते, मात्र १२ नगरसेवकांनी पत्र स्वीकारले नाही. १२ नगरसेवकांनी जी सभा घेतली तिची शासकीय दफ्तरी नोंद होत नसल्याने त्या सभेला महत्त्व नाही- मंगेश देवरे, मुख्याधिकारी, धर्माबाद पालिका