शालेय पोषण आहारात १३ लाखांची फसवणूक; मुख्याध्यापिकेसह दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:32 PM2019-07-10T14:32:35+5:302019-07-10T14:34:32+5:30
पोषण आहाराचे ऑडिटच केले नाही
नांदेड : शालेय पोषण आहार योजना, घरभाडे आणि पोषण आहार योजनेचे आॅडिट न करता भोकर येथील भगवान श्रीकृष्ण प्राथमिक शाळेतील सहशिक्षक आणि मुख्याध्यापिकेने संस्था व शासनाची १३ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थाध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर येथील श्रीकृष्ण भगवान प्राथमिक शाळेत सुरुवातीला सहशिक्षक आणि त्यानंतर मुख्याध्यापकपदी कार्यरत असताना १९९६ ते ६ मार्च २०१९ पर्यंत घर भाड्यासाठी सदर मुख्याध्यापिकेने खोटी कागदपत्र तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे शिक्षण विभागाच्या १ लाख ७७ हजार ९७७ रुपयांचा अपहार केला. त्याचवेळी या मुख्याध्यापिका आणि सहशिक्षकाने २०११ ते २०१४ या कालावधीत शाळेमध्ये दिलेल्या पोषण आहार योजनेच्या मूळ खर्चाच्या पावत्या उपलब्ध करुन दिल्या नाहीत. यातून ५ लाख ५० हजार १०२ रुपयांचा अपहार केला. तसेच २०१४ ते २०१६ या वर्षाच्या शालेय पोषण आहार योजनेचे आॅडीट करुन शासनाला व संस्थेला सादर केले नाही. तसेच त्याबाबतचा हिशोबही दिला नाही. यातून शासनाच्या ५ लाख ८३ हजार ७८५ अपहार करुन फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन भगवान श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक आणि मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.