माहूर : येथील नगर पंचायतच्या वतीने अनेक विकासकामे करण्यात आली. मात्र या कामात अनियमितता झाली. कामे निकृृष्ट व दर्जाहीन असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक प्रा. राजेंद्र केशवे यांनी केला. या प्रकरणी चौकशी न झाल्यास उपोषण करण्याची तयारीही केशवे यांनी दर्शविली आहे. या कामावर जवळपास २० कोटी रुपये खर्ची झाले.
आवश्यकता नाही तेथे कामे दाखवून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान करण्यात आले. शहरात दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत ९५ लाख रुपयांच्या निधीतून नाली बांधकाम करण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला. कामाचे भूमिपूजन झाले. नालीचे खोदकाम केले. कच्ची नाली तयार करण्यात आली व पक्क्या नालीचा निधी दुसरीकडे वळविल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवता येतो का, असा सवाल केशवे यांनी केला. विशेष बाब तथा सर्वांगीण विकासासाठी ठोक निधी म्हणून शासनाकडून १० कोटी रुपये देण्यात आले. यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, गटार, रस्ते करायचे होते. असे असताना जंगलात रस्ते टाकून निधीची विल्हेवाट लावण्यात आली. शहरात काही ठिकाणी झालेली कामे उखडली असून मिरवणूक मार्गावर दुतर्फा नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. अतिक्रमणही वाढले आहे.
शहरात यापूर्वी चार कोटी रुपये खर्च करून पथदिवे, सौरऊर्जा दिवे बसवण्यात आले असताना पुन्हा निविदा काढून सौरऊर्जा पथदिवे बसवण्यात आले. ते पण निकृष्ट. आजघडीला ७० टक्के पथदिवे बंद आहेत. कोट्यवधी खर्च करूनही लाइट बिलात एक रुपयाही कमी झाला नसल्याने ७ कोटी रुपये कामांचे खांब भंगारमध्ये टाकण्याची वेळ आली. एकाही कामाचे नियमानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरणकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शासनाकडूनही चौकशी झाली नाही. याचाच फायदा घेऊन संबंधितांनी शासनाच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावली.
घनकचरा तसेच दलित वस्तीतील खेळणे खरेदी, बुद्धभूमी परिसर, सुशोभीकरण, सौर लाइट खरेदी, अनावश्यक ठिकाणी केलेले रस्ते ही सर्व कामे तपासून शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांना दंडित का करू नये, असा सवाल केशवे यांनी केला.
कोट
शहरात झालेली सर्व विकासकामे नियमानुसार झाली आहेत. ठराव घेऊनच सर्वानुमते दलित वस्तीच्या निधीतून कामे करण्यात आली. सौरऊर्जा कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीही झाली. इतर विकासकामेही दर्जेदार झाली आहेत.
- विद्या कदम, मुख्याधिकारी, नगर पंचायत, माहूर