२० हजार हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:11 AM2019-06-02T00:11:03+5:302019-06-02T00:12:42+5:30
बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे.
बारूळ : बारूळ कृषी मंडळांतर्गत ३२ गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी सज्ज असून या ३२ गावांच्या शेतातील कृषी विभागाकडून माती तपासणी करण्यात आली आहे. यंदा कापूस व सोयाबीन क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले़
बारूळ कृषी मंडळांतर्गत बारूळ, कौठा, काटकळंबा, मंगलसांगवी, वरवंट, चिंचोली, चिखली, औराळ, उस्माननगर, लाठी, दहीकळंबासह दिंडा, बिंडा, गुंडा, वाडी-तांड्यासह ३० गावांतील शेतकऱ्यांनी शेतातील १० हजार ५०० नमुने माती तपासणी केली़ शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी आपली शेती १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र नांगरूण, वखरून सज्ज ठेवली असून बळीराजा आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे़
मागील तीन वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीचा सामना करणाºया या मंडळातील शेतकºयांना सातत्याने अवर्षणस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे़ या संकटातूनही शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे़ अशा परिस्थितीत आगामी खरीप हंगामात नव्या जोमाने कामाला लागून पेरणी केली जाणार आहे़ दरवर्षी निसर्गासोबत शेतकºयांचा हा खेळ सुरू असून शेतकरीही दुबार, तिबार पेरणी करत निसर्गासोबत सामना करीत आहेत. कृषी विभागाने या पार्श्वभूमीचा आढावा घेवून शेतक-यांसोबत पेरणीसंबंधी, लागवडीसंबंधी, बी-बियाणेसंबंधी प्रत्येक गावात थेट चर्चा करून शेतक-यांना मार्गदर्शन केले़ कृषी विभागाच्या मते, यंदा कापूस, सोयाबीन, ज्वारी क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती दिली़
बारूळ मंडळातील २८ कृषी दुकाने आहेत़ शेतक-यांना बी-बियाणे, खते, औषधी योग्य दरात व पाहिजे तो माल मिळेल, यासाठीही कृषी दुकानातून पिळवणूक होऊ नये, अशी मागणी बळीराजाकडून होत आहे़
बारूळ मंडळात मागील वर्षी ढगफुटी
बारूळ मंडळात मागील वर्षी जूनमध्ये ढगफुटी झाली़ त्यात शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ पण तब्बल एक वर्ष उलटूनही शेतक-यांना मदतीसाठी ना शासन, ना पुढारी समोर येत आहे़ त्यामुळे निसर्गहानी झाल्यावरही प्रशासन नुकसान निरंक ठेवतो, त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही, या चिंतेत बळीराजा आहे़
बारूळ कृषी मंडळअंतर्गत ३० गावांतील १९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र खरीप पिकासाठी शेतक-याने सज्ज ठेवले असून यंदा कापूस, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे
-आऱ एम़ भुरे, कृषी पर्यवेक्षक़