२६ लाखांच्या वीजबिल अपहारातील आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:32 AM2018-12-21T00:32:37+5:302018-12-21T00:33:06+5:30
येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़
भोकर : येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़
न्यायालयाच्या आदेशाने जुलैमध्ये सहा जणांना विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यापैकी आरोपी प्रविण आनंदराव ताडेवाड यास अटक केली असून अन्य ५ आरोपी अद्याप फरारच आहेत.
येथील वीज वितरण उप विभागातील विविध पदावर कार्यरत ६ कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन पोपूलवाड यांनी पोलीसात तक्रार देऊन सेवेत असलेल्या ५ कर्मचाºयांना निलंबित केले होते. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब लावल्याने प्रकरण भोकर न्यायालयात दाखल केले होते. यावरुन न्यायालयाच्या आदेशाने जुलै महिन्यात प्रकरणातील ६ आरोपीविरुद्ध भोकर पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांना यातील एकही आरोपी सापडला नाही. आरोपींनी जामीना मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतू त्यांना जामीन मिळाला नाही. अखेर यातील आरोपी प्रवीण आनंदराव ताडेवाड (रा. भोकर) यास गुरुवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याच गुन्ह्यातील इतर ५ आरोपी कधी अटक होणार, याकडे लक्ष लागले आहे.
असा झाला होता अपहार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उप विभागीय कार्यालयात विविध पदावरील अधिकारी व कर्मचा-यांनी पदाचा गैरवापर करून १ जानेवारी २०१६ ते मार्च २०१८ या काळात शासकीय पैशाचा अपहार करण्याच्या हेतूने ७५ ग्राहकांचा संकेताचा वापर करुन विज बिल कमी करुन १४ लाख ६५ हजार ६८० रुपये तसेच ९० विजग्राहकांच्या खोट्या व बनावट पावत्या तयार करून १२ लाख १० हजार १३३ रुपये, असे एकूण २६ लाख ५० हजार रुपयाचा अपहार केला होता. याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन गोपूलवाड यांच्या तक्रारीनंतर भोकर न्यायालयाच्या आदेशाने ६ कर्मचाºयांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यात उच्च स्तर लेखा लिपिक प्रवीण आनंदराव ताडेवाड रा.भोकर, सहा.लेखापाल (सेवानिवृत्त) सविता विश्वनाथ लाठकर रा.भोकर, निम्नस्तर लिपिक अनिल माधवराव फिरंगे (रा. भोकर) निम्नस्तर लिपिक संदीप प्रभाकर वांद्रे (रा.ग्यानमाता हायस्कूल जवळ नांदेड), उप कार्यकारी अभियंता विश्वनाथ रतनबुवा भारती (रा.छत्रपती चौक नांदेड), उपकार्यकारी अधिकारी बालाजी चिंतामणी पांचाळ (रा.पावडेवाडी नाका, नांदेड) आदींचा समावेश आहे.