नांदेड : किनवट तालुक्यातील उनकेश्वर नाका येथे एका टेम्पोची तपासणी करुन आचारसंहिता पथकाने चार लाख रुपये किमतीची ३१५० चांदीची नाणी पकडली आहेत़ या टेम्पोमध्ये मसाला आणि इतर साहित्य होते़ या चांदीच्या नाण्याबाबत चालक व त्याच्या सहकाऱ्याला आतापर्यंत समाधानकारक उत्तर देता आले नव्हते़विस्तार अधिकारी संजय एकनाथ गुमटकर हे आचारसंहिता पथकात कार्यरत असून २२ मार्चच्या सायंकाळी ते इतर कर्मचाऱ्यांसह उनकेश्वर नाका येथे वाहनांची तपासणी करीत होते़ त्याचवेळी एम़एच़४०, वाय-७६३९ या क्रमांकाचा आयशर कंपनीचा टेम्पो त्या ठिकाणी आला़ सदर टेम्पोच्या केबिनची तपासणी केली असता त्यामध्ये पांढरे पोते शिवलेले होते़ त्याबाबत चालकाला विचारपूस केली असता त्याने यामध्ये भेटवस्तू असल्याचे सांगितले़ त्यानंतर पथकाने पोते बाहेर काढून त्याची तपासणी सुरु केली़ यावेळी चालक अरुण गणेशराव सर्याम (रा़पिंपळदरा ता़नरखेड) व मंगेश रमेशराव कानारकर, सुरुची कंपनी वर्कर (रा़नागपूर) या दोघांना ताब्यात घेतले़ पोत्यात चांदीचे शिक्के आढळून आले़प्रत्येक पाकीटात २०० शिक्के असलेले १६ पाकीट त्या पोत्यात होते़ त्यानंतर विनोद सकवान या सोनाराकडून त्याची शुद्धता आणि वजन तपासण्यात आले़ प्रत्येक पाकिटाचे वजन हे ४३० ते ४६० ग्राम होते़ अशाप्रकारे ३ हजार १५० शिक्क्यांची किंमत एकूण चार लाख रुपये होते़ ताब्यात घेतलेल्या दोघांनाही सदर मालाबाबत कोणतेही कागदपत्र सादर करता आले नाही़ त्यामुळे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
चार लाखांची चांदी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:36 AM