नांदेड - शहरातील इतवारा भागात असलेल्या कापड दुकानाचे पत्रे कापून आतील ४४ हजार रुपयांचे कपडे लंपास करण्यात आले. ही चोरीची घटना १८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रियाजोद्दीन रफियोद्दीन यांची हबीब टॉकीज भागात कापड विक्रीची टपरी आहे. १८ जानेवारीच्या रात्री चोरट्याने कटरने टिनपत्रे कापून दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानातील कापड लंपास करण्यात आले. या चाेरीप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गीते करत आहेत.
घरातून मोबाईल केला लंपास
नांदेड - देगलूर येथे एका रुग्णालयाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील घरातून चोरट्याने १८ हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला. ही घटना २१ जानेवारी रोजी घडली. यादव सायलू बत्तलवार यांचे तिसऱ्या मजल्यावर घर आहे. दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने मोबाईल लांबविला. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अल्पवयीन मुलाला पळवले
नांदेड - बिलोली तालुक्यातील मौजे भोसी येथील एका १६ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. ही घटना १९ जानेवारी रोजी घडली. संजय रामराव पाटील यांच्या तक्रारीवरुन बिलोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.