पाच वर्षांपूर्वीचे प्रकरण; राखी पोर्णिमेला खून अन् राखी पोर्णिमेलाच आरोपींना शिक्षा
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: August 31, 2023 12:31 PM2023-08-31T12:31:10+5:302023-08-31T12:31:42+5:30
खून प्रकरणी आरोपीतील दोघांना जन्मठेप तर तिघांना सश्रम कारावास
कंधार(नांदेड) : पाच वर्षांपूर्वी राखी पोर्णिमेच्या दिवशी लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हे येथे भावकितील वादातून वृध्दाचा धारदार शस्त्राने निर्घून खून करण्यात आला होता. आज बुधवारी ३० ऑगष्ट रोजी राखी पोर्णिमेच्याच दिवशी कंधार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी या खटल्याचा निकाल देताना दोन आरापींना जन्मठेप तर तीन आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. घटना व शिक्षेतील राखी पोर्णिमेच्या योगायोगाची आज कोर्टात चर्चा होती.
आरोपी मोरारजी घाटोळ व गणेश घाटोळ यांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, पद्मिनबाई घाटोळ व भाऊराव घाटोळ यांना एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तर संगीता मोरे हीस एक वर्षाचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. लोहा तालुक्यातील बोरगाव कोल्हे येथील आनंदराव घाटोळ (७४) हे २६ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी गावालगत शौचास गेले होते. यावेळी आरोपी मोरारजी भाऊराव घाटोळ (३२), गणेश भाऊराव घाटोळ (४२), भाऊराव ग्यानोबा घाटोळ (७२), पद्मिनबाई भाऊराव घाटोळ (६५) व संगीता संभाजी मोरे (३६) (सर्व रा. बोरगाव) यांनी संगनमत करून त्यांच्यावर धारदार कत्ती आणि काठीने मारहाण केली.
त्यानंतर आनंदराव घाटोळ यांच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्याच दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सोनखेड पोलिस ठाण्यात पवन घाटोळ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात बुधवार, ३० ऑगस्ट रोजी साक्ष व पुरावे तपासून न्यायालयाने या प्रकरणात फिर्यादीची बाजू सरकारी वकील ॲड. महेश कागणे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ मधुकर मोरे व पोहेकॉ अशोक हंबर्डे यांनी काम पाहिले.