नांदेड : समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करून कुप्रथांना मूठमाती देण्यासाठी तरुणाईने विवेकी जीवनशैली, चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक विचार आत्मसात करावेत असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव शिवराम पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरुवारी सकाळी आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते. बुरसट विचार, कर्मकांड, भोंदूगिरी, आणि अविद्येने ग्रासलेला समाज आहे़ या समाजाला विवेकी जीवनशैली आत्मसात करून दिशा दिली जावू शकते़ ते काम तरुणाईकडूनच होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ आजही समाजात अनेक वाईट चालीरीती आहेत़ जादू-टोणा, नरबळीसारख्या घटना अंधश्रद्धेतून घडत आहेत़ दुसरीकडे स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत़ ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत यातून बाहेर पडण्यासाठी तरुणाईने आवाज उठविण्याची गरज व्यक्त करीत संत तुकारामांनी अंधश्रद्धेविरुद्ध ओढलेले ताशेरे, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीविरोधी कुप्रथा, मानसिक गुलामगिरी विरुद्ध पुकारलेले बंड, त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिप्रेत असलेली समाजरचना यावरही त्यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला़ विधायक विचार समाजात पोहोचविण्याचे एक माध्यम म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना त्यामागील कार्यकारणभाव जाणून घेऊन निर्माण होणाऱ्या प्रश्नांना विवेकाने उत्तर न देता आल्यास त्या गोष्टीला अंधश्रद्धा मानावे असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीमागील वैज्ञानिक कारण समजून घेण्याची गरज व्यक्त करतानाच प्रेम व आकर्षण यातील फरक डॉ़हमीद दाभोळकर यांनी स्पष्ट केला़ विवेक वाहिनीच्या माध्यमातून विद्यार्थी, स्त्रिया आणि अशिक्षित समाजाचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नाबाबत त्यांनी माहिती दिली़ याच कार्यक्रमात डॉ. डी. बी. ढोणे यांनी लिहिलेल्या 'स्पेशल रॅलेटिव्हिटी विथ आइन्स्टाइन २०१५' या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
मंचावर तेलंगणा राज्याचे सह-सचिव एल शरमन, डॉ. डी. बी. ढोणे, डॉ. शिवाजी शिंदे, श्री शरद चालिकवार, कल्पना जाधव, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अमन कांबळे, प्रा. एस. बी. जाधव, प्रा. गुरुदीपसिंग वाही यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन डॉ. निलेश आळंदकर यांनी मानले.