कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अध्यापकांचे समायोजन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:20+5:302021-05-23T04:17:20+5:30
नांदेडसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अत्यवस्थ असणारे रूग्ण खासगी रूग्णालयात भरती करून घेतले ...
नांदेडसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अत्यवस्थ असणारे रूग्ण खासगी रूग्णालयात भरती करून घेतले जात नसल्याने त्यांना शासकीय रूग्णालयाशिवाय पर्याय नसतो. अशा हजारो रूग्णांवर उपचार करण्याची जोखीम उचलून काम करणारे कर्मचारीच सेवांपासून वंचित राहत आहेत. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अध्यापकांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्यावतीने वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मुंबई यांना विविध मागण्याचे निवेदन पाठविले आहे. सहाय्यक प्राध्यापकांना शासन सेवेत समायोजित करावे, पदोन्नतीचे प्रस्ताव त्वरीत कार्यवाही केल्यास नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सिंधुदुर्ग, अलिबाग, सातारा, जळगाव, नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापकांची कमतरता जाणवणार नाही, सातव्या वेतन आयोगात वैद्यकीय व्यवसाय रोध भत्ता, पदव्युत्तर भत्ता, रिसर्च भत्त्यासंदर्भातील निर्णय घेवून थकबाकी त्वरीत अदा करावी, कोविड काळात जोखीम वाढविण्यासाठी विशेष भत्ता द्यावा, नांदेड येथील अध्यापकांना ८ टक्के घरभाडे भत्ता मिळत आहे, परंतु, इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६ टक्के दिला जात आहे. त्यामुळे नांदेडातही १६ टक्के दराने भत्ता द्यावा, कोविड आजारामुळे रजेवर असलेल्या अध्यापकांना विशेष भरपगारी रजा आरोग्य विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे मंजूर करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदनावर अध्यक्ष डॉ.संजय मोरे, सचिव डॉ.मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.