विष्णूपुरीतील पाणी बचावासाठी प्रशासन कठोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:00 AM2018-11-14T00:00:02+5:302018-11-14T00:02:15+5:30
विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
अनुराग पोवळे।
नांदेड : विष्णूपुरीतील झपाट्याने कमी होणारा जलसाठा लक्षात घेता शहराला दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याच्या हालचालींना महापालिकेत वेग आला आहे. दुसरीकडे विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
एकीकडे पाटबंधारे विभागाची सिंचनासाठी पाणी सोडण्याची लगबग तर दुसरीकडे महापालिकेची पिण्याच्या पाण्याची तजवीज कशी करायची याची चिंता महापालिकेला लागली आहे. विष्णूपुरीत आजघडीला केवळ निम्मा जलसाठा शिल्लक आहे. त्यातही आता पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी १५ नोव्हेंबरपासून एक पाणीपाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते ३० नोव्हेंबरपर्यत सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे.
यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील १५ दलघमीहून अधिक जलसाठा कमी होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रकल्पाचा जलसाठा तळाशी जणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात पाणी घेण्यासाठी आता कोणतेही पर्याय शिल्लक उरले नाहीत. येलदरी, सिद्धेश्वरही कोरडेठाक पडले आहेत. या पार्श्वभूमीवर विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा सांभाळण्याची मोठी जबाबदारी प्रशासनावर आली आहे.
‘लोकमत’ ने १३ नोव्हेंबर रोजी नांदेडवरील जलसंकटाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला. प्रभारी जिल्हाधिकारी लहुराज माळी यांनी मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील अधिकाºयांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे आदेश जिल्हाधिकारी माळी यांनी दिले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, नांदेड, कंधारचे उपविभागीय अधिकारी तसेच गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह नांदेड, लोहा, पूर्णा, पालम येथील तहसीलदारांची उपस्थिती होती. त्यासह पोलीस विभाग, महावितरणचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. विष्णूपुरीतील अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यासाठी नांदेड आणि परभणी जिल्ह्यात ८ संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये नांदेड तालुक्यातील ४, परभणी २ आणि कंधार उपविभागीय अधिका-यांचे दोन पथके राहणार आहेत. या पथकांना अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश करण्यात आले आहेत. या कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिदिन अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र १५ डिसेंबर रोजी बंद करण्याचे आदेशही महावितरणला देण्यात आले आहेत. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत मोटारी काढण्यास राजकीय विरोध प्रारंभी केला गेला. परिणामी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली पथके काही ठिकाणांवरुन परत आली होती. आता मात्र पथकांनी कोणताही विरोध न जुमानता कारवाई करण्याचे आदेशही माळी यांनी दिले आहेत.
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा संपल्यानंतर पर्याय उपलब्ध नाहीत. इसापूर प्रकल्पातील पाणी ७५ किलोमीटरवरुन सांगवी बंधा-यात पोहोचते. एक ते सव्वा दलघमी पाण्यासाठी इसापूर प्रकल्पातून १० दलघमी पाणी सोडावे लागते. त्याचवेळी सांगवी येथील महापालिकेच्या पाणी उपसा करणा-या यंत्रणेची क्षमताही अत्यल्प आहे. त्यामुळे इसापूर प्रकल्पातून पाणी घेऊन नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्याची भूमिका व्यवहार्य नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या हालचाली
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने आगामी काळात पाणी उपलब्ध होण्यात अडचणी संभवणार आहेत. पर्यायही उपलब्ध नसल्याने उपलब्ध जलसाठा जास्तीत जास्त कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली महापालिकेत सुरु आहेत. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत पदाधिकाºयांसह शहरवासियांनाही अवगत केले जाणार आहे.