महापालिका निवडणूक विभागाने वाॅर्डरचनेच्या तयारीसाठी २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा डाटा मुंबई कार्यालयातून मागितला आहे. त्याचवेळी शहरात प्रगणक गटांचीही स्थापना केली जात असून, बेस मॅपद्वारे वाॅर्डरचनेचा आढावा घेतला जाणार आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख ५० हजार इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख बारा हजार, तर अनुसूचित जमातीची जवळपास बारा हजार लोकसंख्या आहे. प्रत्यक्षात आता लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढीव लोकसंख्येनुसार निवडणुका झाल्यास शहरातील वॉर्डांची संख्या वाढणार आहे. मात्र २०११च्या जनगणनेनुसारच वाॅर्डरचना केली जावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे ही माहिती जनगणना विभागाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातून मागविण्यात आली आहे. महापालिकेच्या २० प्रभागात सध्या ८१ सदस्य आहेत. त्यात खुल्या प्रवर्गातील २१, अनुसूचित जातीचे १५, अनुसूचित जमाती २, इतर मागासवर्ग प्रवर्गाचे २२ सदस्य आणि महिला सदस्यांची संख्या २१ इतकी आहे.
वाॅर्ड की प्रभाग, संभ्रम कायम..
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका प्रभाग रचनेऐवजी वाॅर्डरचनेनुसार घ्याव्यात, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. मात्र त्यानंतरही महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांकडून प्रभाग पद्धतीचा आग्रह धरला जात आहे. निवडणुका वाॅर्डपद्धतीने की प्रभाग रचनेनुसार याबाबत निर्णय घेऊ असेच सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निवडणुका प्रभाग की वाॅर्डरचनेनुसार होतील याबाबत संभ्रम कायम आहे तर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाॅर्डरचना ग्राह्य धरून अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत अन् सोशल मीडियावर तसा प्रचारही सुरू केला आहे.