पोलीसांच्या मारहाणीनंतर युवकाने जाळून घेतले; फौजदारासह एक कर्मचारी बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:54 AM2019-07-18T11:54:42+5:302019-07-18T12:01:04+5:30
याप्रकरणी फौजदार व पोलीस नाईक यांना बडतर्फ करण्यात आले आहे
नांदेड : हिमायतनगर येथील शेख सद्दाम या युवकाच्या जळीत प्रकरणात गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा शिवाजी काळे आणि पो ना संतोष गंगाधरराव राणे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश विशेष पोलीस निरीक्षक प्रकाश मुत्याल आणि बुधवारी रात्री उशिरा काढले. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काळे आणि राणे यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती.
कौटुंबिक वाद झाल्याने झालेल्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी शेख सद्दाम यांनी ३ जुलै रोजी पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पोलीस कर्मचारी संतोष राणे, जिचकार यांनी फिर्याद न घेता सद्दाम यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील रोख १७ हजार ५०० व सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर सद्दाम यांनी ठाणे परिसरातच स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात ते ८० टक्के भाजले असून, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेला जबाबदार धरून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी सद्दाम यांच्या नातेवाईकांनी लावून धरली. बुधवारी पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, संतोष जिचकार, संतोष गंगाराम राणे, शेख सिराज शेख सरदार, शेख सरदार, जिशान मिर्झा यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला. शेख सिराज, शेख सरदार, शेख सरदार यांना अटक झाली. उर्वरित आरोपी फरार आहेत.
या प्रकरणात कसूरदार उपनिरीक्षक काळे, पो ना राणे यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षक जाधव यांनी बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार विशेष पोलीस निरीक्षक मुत्याल यांनी बडतर्फीचे आदेश काढले.
हिमायतनगरमध्ये फौजफाटा
घटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलीस प्रमुख विजय पोवार, सहा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन हिमायतनगरात तळ ठोकून आहेत. घटनेतील दोषींना पाठीशी घालणार नाही, असे दोघांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कायदा हा सर्वांसाठी समान असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल. आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले आहे.
- रवींद्र बोरसे, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर