भोकर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील सकल मराठा समाजाने मंगळवारी पुकारलेल्या भोकर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्याचे चित्र पहावयास मिळाले.
बंदमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आणि लहानसहान व्यावसायिकही सहभागी झाले होते. दरम्यान शेकडो सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळपासून ठिय्या दिला. आंदोलकांनी खासदार आणि आमदार यांना प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत प्रमुख रस्त्यावरुन तहसील कार्यालयापर्यंत आंदोलकांनी रॅली काढली. आंदोलनस्थळी अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने यांनी भेट दिली. पो.नि. नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले होते.
तहसीलदारांना निवेदनआंतरवाली सराटी येथील घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे व मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार राजेश लांडगे यांना सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आले. तसेच येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इंडीयन मुस्लिम लिग, एमआयएम आदी पक्षाने पाठिंबा देवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आह.