उमरीत अंगणवाडी पोषण आहार वाटप चौकशी संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:46 AM2018-09-25T00:46:59+5:302018-09-25T00:47:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : तालुक्यातील सोमठाणा येथे अंगणवाडीच्या पोषण आहार खाद्यसामग्रीचा गावकºयांनी पकडलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी मात्र संशयाच्या भोवºयात सापडली आहे. सलग तिसºया दिवशीही याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.
उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे २२ सप्टेंबर रोजी सकाळी अंगणवाडी पोषण आहार खाद्यसामग्रीचे वाटप करण्यासाठी टेम्पो आला होता. यात बटाणा, मिरची पावडर, गूळ, हळद, सोयाबीन तेल, शेंगदाणा व मटकी अशी आठ प्रकारची खाद्यसामग्री अंगणवाडीला उतरविण्यात आली. यात दोन क्विंटल ३० किलोंऐवजी केवळ दीड क्विंटल बटाणा उतरविण्यात आला. यासंदर्भात संशयावरून गावकºयांनी पावती व प्रत्यक्षात उतरवण्यात आलेल्या मालाची तपासणी केली. यावेळी मोठी तफावत दिसून आली . म्हणून टेम्पोचालकाकडे चौकशी केली. त्याच्याकडून टेम्पोच्या चाव्या काढून घेण्यात आल्या. यावेळी पितळ उघडे पडण्याच्या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे गावकºयांचा संशय आणखी बळावला.
दरम्यान, विस्ताराधिकारी पी. एल. जाधव यांनी पंचनामा केला. गावकºयांनी आज खाद्यसामग्रीच्या मालाने भरलेला टेम्पो पोलिसांच्या हवाली केला. शनिवारी झालेल्या या घटनेनंतर तीन दिवस उलटले. तरीही कसलीच ठोस कारवाई झालेली नाही. २४ रोजी सोमवारी दुपारी उशिराने बालविकास प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश नगराळे हे उमरी येथे दाखल झाले .
यावेळी सोमठाणा येथील सरपंच विरेंद्रसिंह चंदेल यांनी याप्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली याची विचारणा केली असता अद्यापपर्यंत कसलीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी सांगितले. याबाबत सरपंच चंदेल यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या हवाली करण्यात आलेल्या टेम्पोमध्ये उर्वरित वाटपाचा माल पडून आहे. उर्वरित किती गावांना वाटप करणे बाकी आहे ? आतापर्यंत किती गावामध्ये वाटप झाले ? याबाबत कसलीच माहिती मिळू शकली नाही. टेम्पोचालक घटनास्थळावरून तीन दिवसांपासून गायब होण्याचे काय कारण असू शकते? नांदेड जिल्ह्यात कृष्णूर येथील अनाज कंपनीच्या रेशनचा धान्य घोटाळा गाजतो आहे. असे असताना उमरीच्या अंगणवाडी पोषण आहार वाटपाचा टेम्पो पकडल्यानंतर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे दिसत आहे. म्हणून या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत. याबाबतचा संशय वाढला आहे. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची कसून चौकशी करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
सोमठाणा येथे ठेकेदाराने कमी माल दिला म्हणून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी ही आपली स्पष्ट भूमिका आहे. यात पूर्णपणे ठेकेदाराचा दोष आहे आपण कुणालाच पाठीशी घालणार नाही- ओमप्रकाश नगराळे, बालविकास प्रकल्प अधिकारी, उमरी