भुईमूग पिकाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा विळखा
कंधार : तालुक्यात १७ हजार २२१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. खरीप हंगामातील झालेल्या पीक नुकसानीची कसर भरून काढण्यासाठी रब्बी आणि उन्हाळी हंगामावर अनेक शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. परंतु दि. १८ फेब्रुवारी रात्रीपासून भीज पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवारात कापणी करून आडवा केलेल्या गहू, हरभरा पिकावर पाऊस कोपला आहे. त्यामुळे पिकाची अवकळा झाल्याचे चित्र आहे तसेच ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी भुईमुगाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा विळखा बसल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.
यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक फटका देणारा ठरला. अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे पिकाची नासाडी केली. सलग दोन वर्ष आर्थिक हानी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकातून आर्थिक आधारासाठी प्रयत्न केला. गहू आठ हजार ५०० हे., हरभरा सात हजार ९०० हे., ज्वारी ४३०, चारापीक २१०, करडई ४० हे. आदीची मोठ्या आशेने लागवड केली. उन्हाळी हंगामात भुईमूग चार हजार ८०० हेक्टर, ज्वारी ४५० हे., चारापिके २८० हे., सोयाबीन १५० हे. लागवड करण्यात आली.
गत काही दिवसापासून हरभरा काढणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना हरभरा पीक उताऱ्याने चांगला आधार मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. परंतु अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कापणी केलेल्या हरभरा व गव्हाची भीज पावसाने नासाडी केली. गव्हाचा रंग बदलून कमी भाव मिळण्याचा धोका आहे. त्यातच उन्हाळी भुईमूग पिकाला पाने गुंंडाळणाऱ्या अळीचा विळखा बसला आहे. गत काही दिवसापासून ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अळीचा अटकाव करण्यासाठी आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यातच अशीच अवकाळी पाऊस व गारपीट झाली तर फळपीक, पालेभाज्या आदी पिकाला धोका निर्माण होण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
चौकट
भुईमूग पिकाला पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी अलिका १० मि.ली. अधिक बुरशीनाशक २५ ग्रॅम. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे अळीचे नियंत्रण करता येईल.
रमेश देशमुख (ता.कृषी अधिकारी, कंधार)
तालुक्यात कंधार पर्जन्यमापन यंत्रावर ४ मि.मी., कुरूळा ३, उस्माननगर ४, फुलवळ ५, बारूळ ४ व सर्वाधिक पेठवडज येथे १० मि.मी.ची नोंद झाली आहे.